कर्जत : प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकातील फलाटांवर एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्यास सुरुवात झाली आहे.
तिकीटांचे आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी कर्जत स्थानकात येणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. आपला आरक्षित डबा शोधण्याच्या नादात कधी गाडी चुकायची तर काही वेळा डबा पकडण्याच्या नादात अपघातही व्हायचे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसविण्यात यावेत, यासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल गेल्या दोन वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते.
रेल्वे प्रशासनान सुरुवातीला कर्जत रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्सची गरजच नाही, असे कळविले होते. यावर ओसवाल यांनी कर्जत रेल्वे स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणार्या इंडिकेटर्सची का आवश्यकता आहे, हे पटवून दिले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने याकरिता कोणी जाहिरातदार उपलब्ध होतो काय? किंवा कुणी व्यावसायिक प्रसिद्धीसाठी उपलब्ध होतो काय? हे पाहिल्यावर कर्जत रेल्वे स्थानकावर तसे इंडिकेटर्स बसविण्यात येईल. असे ओसवाल यांना कळविले होते. ओसवाल यांनी पाठपुरावा केला असता रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना फलाट क्रमांक एकची लांबी वाढविल्यानंतर इंडिकेटर्स बसविण्यात येतील असे कळविले होते. मात्र त्यानंतरही रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. शेवटी कर्जत रेल्वे स्थानकावर इंडिकेटर्स बसविले नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिल्यानंतर या कामाला विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मंजुरी दिली. त्यानुसार आता स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्यास सुरुवात झाली आहे.
कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे व येत्या काही दिवसात पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
-पंकज मांगीलाल ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत