Breaking News

वाधवान बंधूंना व्हीआयपी ट्रीटमेंटवर मुख्यमंत्र्यांचे मौन का? : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
वाधवान बंधूंना व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी केवळ एखाद्या आयपीएस अधिकार्‍यावर कारवाई करून चालणार नाही. याची जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वीकारावी लागेल. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. ते काय कडक कारवाई करणार आहेत ते सांगायला हवे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले आहे. हे मौन सोडून त्यांनी बोलायला हवे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंचा उल्लेख ’माझे फॅमिली फ्रेंड’ असा करीत राज्याच्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांच्या पाच गाड्यांसाठी विशेष पास जारी केला होता. या सर्वांना कौटुंबिक अत्यावश्यक कारणासाठी खंडाळा येथून महाबळेश्वरला जायचे आहे, असेही पासवर नमूद करण्यात आले होते. संबंधित पाच गाड्यांचे नंबर तसेच गाड्यांमधून प्रवास करणार्‍या व्यक्तींची नावेही या पासवर आहेत. ही बाब समोर आल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गुप्ता यांच्यावर कारवाई करीत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले, मात्र या अधिकार्‍याचा बोलविता धनी कोण हे समोर यायला हवे, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, कोरोनामुळे देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. अशी स्थिती असताना वाधवान व त्यांचे कुटुंबीय चक्क सरकारची परवानगी घेऊन फिरायला जातात ही धक्कादायक बाब आहे. वाधवान बंधूंवर सीबीआयचा लूकआऊट वॉरंट आहे तसेच ईडीकडून त्यांची चौकशीही सुरू आहे. असे असताना त्या चौकशीला गैरहजर राहून सरकारच्या मर्जीने ते चक्क फिरायला जातात हा सारा प्रकारच निषेधार्ह आहे.
या प्रकारासाठी केवळ प्रधान सचिवांना जबाबदार धरून चालणार नाही. कारण कोणताही वरिष्ठ आयपीएस अधिकारी अशा प्रकारचा निर्णय वा पत्र स्वत:हून देत नाही. म्हणूनच कोणाचा तरी आशीर्वाद किंवा आदेश असल्याशिवाय असे पत्र निघूच शकत नाही, असे आमचे म्हणणे असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply