खारघरमध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
खारघर वसाहतीत राहणार्या कोरोनाबाधित रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील हा पहिला कोरोनाबळी ठरला आहे. दुसरीकडे गेल्या 48 तासांमध्ये पनवेल तालुक्यात एकही नवा कोरोना रूग्ण आढळलेला नाही.
खारघर सेक्टर 15 येथील घरकुलमध्ये राहणार्या रिक्षाचालकाला कोरोना झाल्याने दोनच दिवसांपूर्वी वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो व्हेंटिलेटरवर होता, मात्र उपचारादरम्यान गुरुवारी (दि. 9) रात्री 9.55 वाजता त्याचा मृत्यू झाला. एडीआरएस, डेंग्यू आणि कोव्हिड-19मुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. दुसरीकडे, मृत व्यक्तिची आई, पत्नी आणि मुलीचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
पनवेल तालुक्यात कोरोनाचे 21 रुग्ण असून त्यात खारघरमधील चार जणांचा समावेश आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने सायबर सिटी म्हणून ओळखली जाणारी खारघर नगरी हादरली आहे. पनवेल महापालिका आयुक्तांनी गुरुवारीच खारघर घरकुल हा भाग कंटेन्मेट झोन जाहीर केला होता. या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.