कर्जत, मुरबाडकरांचे टेन्शन दूर

कर्जत ः बातमीदार
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र धाडवड यांची तसेच त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 21 एप्रिलला कस्तुरबा रुग्णालयातून आलेल्या आरोग्य पथकाने त्यांचे स्वॅबचे नमुने घेतले होते. त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आले असून ते निगेटिव्ह आहेत. यामुळे कर्जत व मुरबाड तालुक्याचे टेन्शन कमी झाले, मात्र यानिमित्त त्यांचा अंबरनाथ येथील भाऊ खरंच कोरोना पॉझिटिव्ह आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असून कोरोनाची भीती म्हणून डॉ. धाडवड यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेण्यासाठी हे कुभांड रचले होते का, याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी कर्जत व मुरबाड तालुक्यातील सर्वसामान्य करीत आहेत. अंबरनाथ येथे राहणार्या आपल्या भावाला भेटायला 14 एप्रिलला ते गेले होते. तेथून येऊन डॉ. धाडवड यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 एप्रिलपासून 17 एप्रिलपर्यंत वैद्यकीय तपासणी केली. डॉ. धाडवड यांच्या भावाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉ. धाडवड यांना क्वारंटाइन व्हायला लावले.त्यांना तत्काळ कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले असतानाही त्यांनी 20 एप्रिलपर्यंत टेस्ट केली नव्हती. त्याबाबत सर्वत्र गोंगाट सुरू झाल्याने व कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांना डॉ. धाडवड यांचा पत्ता आणि त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल लेखी पत्र देऊन माहिती दिली होती. 21 एप्रिल रोजी मुरबाड तहसीलदारांच्या आदेशाने तेथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बोर्हाटे यांनी डॉ. धाडवड राहत असलेल्या साई संसार रेसिडेन्सी येथे जाऊन त्यांना कोरोना टेस्ट करायला लावली. त्यांचे स्वॅब मुंबई येथून आलेल्या आरोग्य यंत्रणेने नेले होते आणि त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, कर्जत आणि मुरबाड तालुक्यातील शेकडो लोकांना कोरोनाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणार्या डॉ. धाडवड यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी कर्जत आणि मुरबाड तालुक्यातून होत आहे.