पनवेल : बातमीदार
पनवेल परिसरात आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांना सुद्धा धान्य देण्याच्या सूचना तहसीलदार अमित सानप यांनी सर्व रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. धान्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत तांदूळ वाटपाला सुरुवात झाली आहे. पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना तांदुळाचे वितरण सुरू झालेले आहे. मात्र आधार कार्ड लिंक नसल्याने नागरिकांना माघारी जावे लागत आहे. पनवेल परिसरात व तालुक्यात माघारी जाण्याचे प्रमाण अधिक आहे. भर उन्हात तासभर उभे राहून रेशनसाठी नागरिकांचा क्रमांक येत आहे. व त्यावेळी आधार लिंक नसल्याने रेशन दुकानदार धान्य देण्यास नकार देताना दिसत आहेत. त्यामुळे रेशन कार्ड धारकांचा हिरमोड होताना दिसत आहे. त्यामुळे आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांना सुद्धा धान्य देण्याच्या सुचना तहसीलदार अमित सानप यांनी केल्या आहेत. रेशनकार्डधारकाने, दुकानदाराला आधार कार्डचे झेरॉक्स किंवा आधार कार्डचे मोबाइलमधील फोटो दाखवून हे धान्य घेता येणार असल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी दिली आहे. याशिवाय एक लाखाच्या आत उत्पन्न असणार्यांना मे महिन्यापासून धान्य मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, धान्य घेताना सोशल सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना अमित सानप यांनी केले आहे.