Breaking News

पनवेलमध्ये काही नागरिकांकडून केले जातेय नियमांचे उल्लंघन!

पनवेल : बातमीदार

पनवेल परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले आहेत. असे असले तरी देखील मोठ्या प्रमाणात काही नागरिकांची वर्दळ बाजारात व रस्त्यांवर दिसू लागली आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतींनी स्वतःहून पुढाकार घेत ग्रामपंचायत हद्दीत लॉकडाऊन पुकारले आहे. पनवेल महापालिका हद्द व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या जवळपास 40 वर गेलेली आहे. यातील दहा रुग्ण बरे झाल्याने काहीसा सुटकेचा निश्वास पनवेलकर यांनी टाकला आहे. मात्र काही नागरिक यातून बोध घेताना दिसून येत नाहीत. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिक रिक्षा, दुचाकी व मोठ्या प्रमाणात चारचाकी घेऊन जाताना दिसत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त असला तरीदेखील त्यांना चकवा देऊन नागरिक बाजार गाठत आहेत. पोलीस चारचाकी, दुचाकी, रिक्षा जप्त करत असले तरी याचा देखील भान नागरिकांना राहिलेला दिसून येत नाही. ते अन्य रस्त्याने आपली गाडी काढून पनवेल गाठत आहेत. तर काही वेळेला मेडिकलला व भाजी आणायला जायचे आहे असे खोटे सांगून काही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे एका पोलीस अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पनवेलच्या ग्रामीण भागातील नागरिक देखील घरातील जीवनावश्यक वस्तू आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करू लागले आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे या वेळी पालन होताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे रास्तभाव धान्य दुकानात देखील धान्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळू लागली आहे. या वेळी देखील व्यक्तीं व्यक्तीमधील अंतर व मास्क लावले नसल्याचे निदर्शनास येत आहे.

विचुंबे, तक्का परिसर सील

प्रशासन अत्यावश्यक वस्तू हवी असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करत आहे, मात्र काही नागरिक याला तिलांजली वाहताना दिसत आहेत. क्षुल्लक कारणावरून देखील काही नागरिक आपले घर सोडून पनवेलला येताना दिसू लागले आहेत. विचुंबे आणि तक्का या परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने ही ठिकाणे सील करण्यात आली आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply