प्रोग्रेसिव्ह इंडिया फाऊंडेशनचा उपक्रम

पाली ः प्रतिनिधी – कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडणार्या पोलीस बांधवांना प्रोग्रेसिव्ह इंडिया फाऊंडेशनच्या वतीने मास्क, सेनेटायझर, पाणी आदींचे वाटप करण्यात आले. अखिल मानव जातीवर कोरोनाचे संकट ओढवले आहे, मात्र या आणीबाणीच्या स्थितीत पोलीस बांधव रात्रंदिवस जीवाचे रान करून कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करीत आहेत. जनतेच्या आरोग्याची जबाबदारी डॉक्टर आणि पोलिसांनी स्वीकारली आहे.
अशा जिगरबाज पोलीस बांधवांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने प्रोग्रेसिव्ह इंडिया फाऊंडेशनचे चेअरमन संजय सराफ व ललित मोहन पात्रो यांच्या सहकार्याने व पत्रकार धम्मशील सावंत यांच्या पुढाकाराने खोपोली फाटा, नानोसे, जांभूळपाडा पोलीस दूरक्षेत्र, पाली पोलीस स्टेशन व वाकण नाका येथील पोलिसांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. याकामी धम्मशील सावंत, रमेश पवार, प्रयत्नशील सावंत यांचे सहकार्य लाभले. प्रोग्रेसिव्ह इंडिया फाऊंडेशनच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल पोलीस बांधवांनी संपूर्ण टीमचे आभार मानले. पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनीदेखील या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले आहे.
कोरोनासारख्या जैविक महामारीत पोलीस बांधवांचे आरोग्यहित जपण्याच्या उदात्त हेतूने प्रतिबंधात्मक उपाययोजना व खबरदारी म्हणून पोलिसांना मास्क, सॅनिटायझर व पाण्याचे वाटप करण्यात आले. या काळात धम्मशील सावंत यांच्यासारख्या पत्रकारांनी पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या प्रेरणादायी व सेवाभावी कार्यास आमचा सलाम. -बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक, पाली-सुधागड