माणगाव : प्रतिनिधी
थंडीचा कडाका वाढत असतानाच माणगाव परिसरात खवय्यांची पोपटी बरोबरच कौल चिकनला पसंती मिळत असून अनेक खवय्ये सहभोजनासाठी,रात्री पार्टी जागरण करताना कौल चिकनला पसंती देत आहेत. हिवाळया दिवसात तयार झालेल्या वालांच्या शेंगाची पोपटी खवय्यांची खास पसंती असते. या पोपटी पार्टीबरोबरच अनेक खवय्ये कौल चिकनला पसंती देत आहेत. अतिशय चवदार व रुचकर होत असलेल्या कौल चिकनला सध्या तरुणाईची पसंती मिळत आहे.
उघड्या माळरानावर दगडांचा चुला मांडून त्यावर कौल ठेवले जाते. चांगला जाळ करून गरम झालेल्या कौलावर चिकन चांगले भाजून घेतले जाते. कौलावर चिकन भाजून खाण्याची ही पद्धत म्हणजे कौल चिकन होय. स्थानिक तरुण व पर्यटकांची कौल चिकनला चांगली मागणी असून अल्पावधीत ही संकल्पना तरुणाईमध्ये प्रसिद्ध होत आहे.
अशी आहे रेसिपी : पहिल्यांदा कौल चांगले स्वच्छ करून घेतले जाते. चिकनच्या तुकड्यांना चवीनुसार मीठ मसाला लावून एक ते दोन तास मुरून देतात. त्यानंतर गरम झालेल्या कौलावर वारंवार खाद्यतेल टाकून मीठ, मसाला लावलेले चिकनचे तुकडे सर्व बाजूंनी खरपूस भाजून घेतले जाते. मग कौल चिकन खाण्यासाठी तयार होते. थंडीच्या दिवसात पोपटी पार्टी बरोबरच कौल चिकनच्या पार्ट्यांना तरुणाईची पसंती मिळत आहे.
माळरानावर लाकूडफाटा जाळून पारंपरिक पद्धतीने कौलांचा वापर करून तयार केलेले चिकन खाण्यासाठी अतिशय चवदार लागते. कोणताही जास्तीचा खर्च न येता अत्यंत साध्या पद्धतीने हे तयार करता येते. खाण्याचा एक वेगळा आनंद घेण्यासाठी कौल चिकन चांगला पर्याय आहे.
-सुमित मोंडे, माणगाव
साध्या सोप्या पद्धतीने तयार केले जाणारे कौल चिकन चवदार असते. जास्तीचे कोणतेही पदार्थ न वापरता केवळ चिकन, मसाले व तेलाच्या सहाय्याने कौलांवर हे भाजले जाते.
-प्रदीप लांगी, माणगाव