Breaking News

जसखार ग्रामपंचायतीच्या भाजप सदस्याची 24 तासांत घरवापसी; शिवसेनेचे नितीन ठाकूरसुद्धा भाजपमध्ये

उरण : रामप्रहर वृत्त

जसखार ग्रामपंचायतीच्या भाजप सदस्या योगिता अमित ठाकूर यांचा रविवारी (दि. 6) शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून घेण्यात आला होता, परंतु या घटनेला 24 तास होतात न होतात तोच योगिता ठाकूर, त्यांचे पती अमित ठाकूर यांनी कुटुंबीय तसेच कार्यकर्त्यांसह घरवापसी करून भाजपचा झेंडा पुन्हा आपल्या खांद्यावर घेतला आहे. त्यांच्यासोबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उरण तालुकाप्रमुख नितीन ठाकूर यांनीही त्यांच्या समर्थकांसह भाजपत दाखल होत दुहेरी धक्का दिला. महेश बालदी मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामूशेठ घरत, सोनारीचे माजी सरपंच तथा भाजपचे महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, दिनेश तांडेल, कामगार नेते सुधीर घरत, युवा नेते देवेंद्र म्हात्रे यांच्यासह जसखार ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी महेश बालदी यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा विश्वास या जोरावर उरण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. याचा धसका शेकाप आघाडीचे उमेदवार विवेक पाटील यांनी घेऊन माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, तर पायाखालची वाळू सरकू लागलेले आमदार मनोहर भोईर यांनी भाजपमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे, पण भाजपचा पदाधिकारी, कार्यकर्ता हा निष्ठावंत आहे, हे जसखार ग्रामपंचायतीच्या सदस्या योगिता अमित ठाकूर यांनी दाखवून दिले असून, त्यांनी त्यांच्या पक्षात घरवापसी करताना शिवसेनेचा पदाधिकारी आपल्यासोबत आणला आहे. भाजपचे कार्यकर्ते पक्षप्रवेशकर्त्या पदाधिकार्‍यांचा योग्य तो सन्मान करतील, असा विश्वासही बालदी यांनी व्यक्त केला आणि त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply