पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना आवाहन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाविरोधातील लढ्यासाठी सरकारकडून डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली असून, र्लेींळवुरीीळेीी.र्सेीं.ळप असे त्याचे नाव आहे. देशभरातील नागरिकांनी याद्वारे देशाची सेवा करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 26) केले. ते मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असंख्य सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनास एकमेकांशी जोडले आहे. अत्यंत कमी वेळेत या पोर्टलशी सव्वा कोटी नागरिक जोडले गेले आहेत. डॉक्टर्स परिचारिकांसह आशा स्वयंसेविका, एनसीसी व एनएसएसचे सहकारी तसेच विविध क्षेत्रांतील अनेक जणांनी या प्लॅटफॉर्मला आपला प्लॅटफार्म बनवले आहे. हे लोक स्थानिक स्तरावर आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थापन करण्याचे नियोजन करणार्यांमध्ये व त्याची पूर्तता करण्यात खूप मदत करीत आहेत. तुम्हीदेखील याचीशी जोडून घेत देशाची सेवा करू शकता.
संपूर्ण जग कोरोनाविरोधात एकवटले आहे. जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेने याविरोधात कसा लढा दिला याची दखल घेतली जाईल. लॉकडाऊनच्या काळात देश कसा एकजूट झाला. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण आपापल्या परीने लढत आहे. सफाई कर्मचार्यांपासून ते पोलिसांपर्यंत सगळ्यांप्रति जनतेच्या मनातील आदर वाढला आहे. कोरोनाच्या काळात सगळेच झोकून देऊन काम करीत आहेत. त्यामुळे स्वच्छता ठेवणार्यांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी होताना दिसत आहे. कुणी घरभाडे माफ करतोय, कुणी किराणा देतोय. शेतकरी शेतात रात्रंदिवस मेहनत करून देशात कुणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी घेत आहे. कुणी पेन्शन देतंय, कुणी शेकडो गरिबांना मोफत जेवण देत आहे. दुसर्यांच्या मदतीसाठी तुमच्या मनात असलेला भाव या लढाईला बळ देत आहे. स्वच्छ भारत अभियानापासून ते गॅस सबसिडी सोडण्यापर्यंत तुमच्यात ही भावना दिसून आली. देशवासीयांच्या या भावनेला मी नमन करतो, असे म्हणत मोदी यांनी सामाजिक कार्यात पुढे आलेल्यांचे आभार मानले.
अतिआत्मविश्वास बाळगू नका!
या वेळी पंतप्रधानांनी ’दो गज दुरी, बहुत है जरुरी’ म्हणत पुन्हा एकदा नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, अतिआत्मविश्वासात फसू नका. आपल्यापर्यंत कोरोना पोहचणार नाही, अशा भ्रमात राहण्याची चूक करू नका. आपल्याकडे म्हटले जाते सावधानता हटी, दुर्घटना घटी. टाळाटाळ करीत सोडून दिलेली आग, कर्ज आणि आजार संधी मिळताच दुसर्यांदा
वाढू शकतात, असे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय. त्यामुळे यावर उपचार गरजेचा आहे.
भारतीय आयुर्वेदाचाही जग स्वीकार करेल
आपण अनेकदा आपल्या शक्तींना मानण्यास नकार देतो, पण जेव्हा इतर देश याबाबत संशोधन करण्याची गोष्ट करतात तेव्हा आपण त्याला मानण्यास सुरुवात करतो. याच कारणाने भारताला वर्षानुवर्षे गुलामीत जगावे लागले. भारताच्या तरुण पिढीला या आव्हानाला स्वीकार करावे लागेल. ज्या पद्धतीने जगाने योग स्वीकारला त्याचप्रमाणे जगाला भारतीय आयुर्वेदाचाही स्वीकार करावा लागेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी या वेळी व्यक्त केला.