Breaking News

बाजारात फळांच्या मागणीत वाढ; अतिरिक्त गाड्यांना परवानगी

पनवेल ः बातमीदार

उन्हाळ्यासह उपवासाच्या रमजान महिन्यात रसदार फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे साहजिकच बाजारात फळांना मागणी वाढली असून निर्यातीतही वाढ झाली आहे. त्यामुळे गेली कित्येक दिवस मरगळ आलेल्या फळ बाजारात आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. फळांची हीच मागणी लक्षात घेता बाजार समितीच्या वतीने फळांच्या अतिरिक्त गाड्यांना परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार आंब्याच्या दररोज 50 हजार पेट्यांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली कित्येक दिवस घाऊक फळ बाजार बंद होता. त्यामुळे फळ व्यापारी आणि फळ उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली होती. अखेर नियमावली तयार करून फळ बाजार सुरू करण्यात आले आहेत, मात्र बाजार आवारात फळांच्या गाड्यांवर मर्यादा घालण्यात आली, परंतु आता रमजान काळात फळांना मोठी मागणी असते. नेहमीच्या मानाने दुप्पट आवक होते. कारण मागणीही दुप्पट असते, मात्र गाड्यांची आवक घटल्याने बाजारात असलेली मागणी पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे व्यापार्‍यांच्या मागणीनुसार आता फळांच्या अतिरिक्त गाड्या बाजारात येऊ दिल्या जात आहेत.  आतापर्यंत फळ बाजारात केवळ 250 गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र आता घाऊक फळ बाजारात फळांच्या सरासरी 400 गाड्या येत आहेत. कलिंगड, टरबूजच्या सोमवारी 50 गाड्या बाजारात आल्या आहेत, तर पपईच्या 21 गाड्यांची नोंद करण्यात आली. हापूस आंब्याचा हंगाम असल्याने बाजारात हापूसची मोठी मागणी आहे. त्यामुळे हापूसची सर्वाधिक आवक होत आहे. हापूसच्या शंभर गाड्यांनाच परवानगी देण्यात आली होती, मात्र व्यापार्‍यांनी केलेल्या मागणीनुसार कोकणातून येणार्‍या हापूस आंब्याच्या दररोज 50 हजार पेट्यांना बाजारात प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती फळ बाजाराचे उपसचिव मसराम यांनी दिली.

आखाती देशांतही मागणी

रमजान महिन्यात आपल्याकडे ज्या प्रमाणात फळांना मागणी असते, तशीच ती आखाती देशांतही आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर दुबईत सध्या मोठ्या प्रमाणात फळांना मागणी आहे. त्यानुसार आंब्यासह पपई, कलिंगड आणि टरबुजाची निर्यात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आकारानुसार हापूस आंब्याची चार ते पाच डझनांची पेटी 1800 ते 2000 रुपयांना विकली जात होती, अशी माहिती व्यापारी शिवाजी चव्हाण यांनी दिली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply