पनवेल : रामप्रहर वृत्त
संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तानाजी खंडागळे यांचे अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 2) दुपारी 3 वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 70 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
या सभेत नायब तहसीलदार रूपाली सोनावणे यांनी कार्यालयात मंजूरीसाठी आलेल्या एकूण 89 अर्जाचे योजनानिहाय माहिती देण्यांत आली. या सर्व अर्जाची समितीचे सदस्यांनी छाननी करून त्यापैकी 70 परिपूर्ण अर्ज मंजूर करण्यात आले व 19 लाभार्थींचे कागदपत्र अपूर्ण असल्याने त्या अर्जांची पूर्तता करण्यासाठी संबंधित लाभार्थींकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या योजनेचा गरजू लाभार्थींना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी गाववार माहिती संकलित करून या योजनेपासून वंचित लाभार्थीना लाभ देण्यासाठी पाठपुरावा करावा असे सूचविण्यात आले. तसेच लाभार्थ्यांकडून प्राप्त अर्जाचे पंचनामे व दाखले तातडीने करून देण्यासाठी संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक यांस सूचना देण्याचे सांगण्यात आले.
या सभेत संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य के. जी. म्हात्रे, जयराम मुंबईकर, गीता चौधरी, शंखुनाथ भोईर, पंचायत समिती पनवेलच्या गट विकास अधिकारी लता मोहिते व संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार रूपाली सोनावणे आणि त्यांचे कार्यालयातील संबंधित कर्मचारी वर्ग
उपस्थित होते.