मुरूड ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू केल्यामुळे लोकांना घरातच बसावे लागत आहे. कोणतेही काम उपलब्ध नसल्याने लोकांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडून सर्व बँकांना कर्जदारांना मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांसाठी कर्जाच्या हप्त्यात सवलत देण्याचे सूचित करण्यात आले आहे, मात्र मुरूड शहरातील मारुती नाका परिसरात असणार्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एसटी कर्मचार्यांनी घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचे हप्ते त्यांच्या पगाराच्या अकाऊंटमधून कपात केल्यामुळे कर्जदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या कृत्यातून स्टेट बँक ऑफ इंडियाकडून केंद्र सरकारच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचे स्पष्ट होत आहे.
एखादे कर्ज जर 60 महिन्यांच्या हप्त्यात फिटत असेल तर त्या कर्जदाराला आता 63 महिन्यांत कर्ज समाप्त करण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु कर्जदारांचे पगार त्याच्या अकाऊंटमध्ये जमा होताच या बँकेला केंद्र सरकारच्या सूचनेचा विसर पडून या बँकेने मार्चपासूनच कर्जाचे हप्ते कट केल्यामुळे कर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुरूड एसटी आगारातील काही कर्मचार्यांनी या बँकेकडून एक लाख रुपयापेक्षा जास्त रकमेची कर्ज घेतली होती, परंतु त्यांचा पगार जमा होताच हप्ते कट करून घेतल्याने या सर्व कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या एसटी कर्मचार्यांना बँकेकडून सांगण्यात आले की जर हप्त्याची रक्कम पुन्हा आपणास हवी असेल तर अर्ज सादर केल्यास तुम्हाला त्या हप्त्याची रक्कम परत करण्यात येईल. त्यामुळे सर्व कर्मचारी गोंधळात पडले आहेत. केंद्र शासनाचे आदेश असतानासुद्धा कर्जाचे हप्ते कपात केल्याने कर्जदार मात्र नाराज झाले आहेत.
जर कर्जदारांना तीन हप्त्यांची सवलत हवी असेल, तर बँकेकडे रीतसर अर्ज करून सुविधा प्राप्त करण्याची मागणी केली पाहिजे. हप्त्याची सवलत ऐच्छिक आहे. याचा फायदा कर्जदाराला होणार नाही. कारण व्याजदर सुरूच राहणार आहे. आमच्या बँकेकडे जे अर्ज करून मागणी करतील, त्यांना आम्ही तीन हप्त्यांची सवलत देणार आहोत. -कुंदन सिंग, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुरूड