नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ व्हायरल झालेल्या पत्रांविषयी मंगळवारी (दि. 8) पत्रकारांनी विचारले असता, पवारांचा पारा चढला आणि ते पत्रकारांवर संतापले. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषिमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करीत अनेक राज्यांना पत्र लिहिले होते. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र व्हायरल झाले असून, भाजप यावरून पवारांवर निशाणा साधत आहे. शरद पवार मंगळवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आले होते. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात या वेळी चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना जुन्हा पत्रांबद्दल विचारण्यात आले असता, त्यांनी यावर भाष्य केले. शरद पवारांनी आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे सांगत अधिक बोलण टाळले, मात्र पत्रकारांनी पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल वारंवार प्रश्न विचारल्याने पवार संतापले. तुम्ही माझा वेळ घालवत आहात. तुम्ही बाहेर उभे होता हे मला योग्य वाटले नाही म्हणून बोलावले. माझी चूक झाली. यानंतर पुन्हा करणार नाही, असे सांगत पवार पत्रकार परिषद सोडून निघून गेले.