Breaking News

राज्यात अघोषित आणीबाणी

माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली असून राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य आणि अभूतपूर्व परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना एक पत्र देत माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा, अशी मागणी केली.
फडसवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करून त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे. वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थ्यांनी सांगितले असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयानेसुद्धा राज्य सरकारला याबद्दल जाब विचारला आहे. सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणार्‍यांचीसुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरू आहेत.  
एकूणच हे प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणीबाणीसदृश्य आहेत. या सर्व घटनांची अतिशय गंभीर दखल घेत याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा, अशी मागणी या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply