रोहे : प्रतिनिधी
रोहा-नागोठणे मार्गावरील पडम येथे मंगळवारी (दि. 28) दुचाकी घसरल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या सहकार्याने दाखल करण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी 5.20च्या सुमारास रोहा-नागोठणे मार्गावर रोहा शहराकडे गणेश वाघमारे आणि शांताराम जाधव हे आपल्या दुचाकीवरून (एमएच 06 बीक्यू 9214) डबल सीट येताना त्यांची गाडी घसरल्याने ते नागोठणेकडे येत असलेल्या डम्परखाली आले, मात्र डम्परचालकाने वेळीच डम्पर थांबवल्याने दोघांचे प्राण वाचले. दुचाकी लांबपर्यंत फरफटत गेल्याने दुचाकीचालकासह मागे बसलेला एक जण जखमी झाला आहे. रोहा पोलिसांना अपघाताची घटना ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर रोहा पोलिसांनी पडम ग्रामस्थ व पडम नाका ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गणेश वाघमारे व शांताराम जाधव या दोघांविरोधात भा. दं. वि. कलम 279, 337, 338 मोटर वाहन अधिनियम 1988चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. एस. एस. अधिकारी करीत आहेत.