Breaking News

संजय राऊतांच्या मागणीला आदित्य ठाकरेंनी दर्शविला विरोध

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना ब्रेबॉर्न स्टेडियमदेखील ताब्यात घेतले जावे, अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे. त्यांच्या या मागणीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र विरोध केला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करीत म्हटले होते की, कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर केला पाहिजे. क्वारंटाइन सुविधेसाठी वानखेडे मैदान ताब्यात घेण्याचा निर्णय योग्य आहे. ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात का घेतले जाऊ नये? तिथेही योग्य सुविधा उपलब्ध आहेत. राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांना टॅग केले होते. आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मागणीला विरोध करीत ट्विटरवरून उत्तर दिले. आदित्य यांनी सांगितले की, आपण स्टेडियम किंवा खेळाची मैदाने ताब्यात घेऊ शकत नाही. मातीची मैदाने असल्याने तिथे पावसाळ्यात चिखल होऊ शकतो. क्वारंन्टाइनसाठी टणक पृष्ठभूमीची गरज असून, त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करीत आहोत.

आदित्य ठाकरे यांच्या उत्तरामुळे वानखेडे मैदान क्वारंटाइनसाठी वापरले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही क्वारंटाइनसाठी कोणतेच मैदानात ताब्यात घेतले जाणार नसल्याचे म्हटले होते. महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाबाधित रुग्णांची वानखेडे स्टेडियममध्ये व्यवस्था करता येईल का याची पाहणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून करण्यात आली होती, मात्र वानखेडे परिसरातील स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला होता.

Check Also

पनवेल भाजी मार्केटमध्ये इनरव्हील क्लबतर्फे कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे शहरातील कृष्णाळे …

Leave a Reply