पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयी खाते उघडले आहे. भाजपचे प्रभाग 18 ब मधील उमेदवार नितीन जयराम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. विरुद्ध उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे ते बिनविरोध झाले आहेत. त्यांच्या विजयी सलामीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
पनवेल महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. त्यापूर्वी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु होती. 30 डिसेंबर 2025 हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. यावेळी प्रभाग 18 च्या ब जागेसाठी भाजपकडून नितीन जयराम पाटील आणि शेकाप आघाडीकडून रोहन अरविंद गावंड यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी अर्ज दाखल केले होते. या अर्जाची छाननी 31 डिसेंबर 2025 रोजी झाली. यामध्ये रोहन गावंड याना जात पडताळणी च्या कागदपत्रांची योग्य पूर्तता न झाल्याने शेकापचे रोहन गावंड यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी पावन चांडक यांनी गावंड यांचा अर्ज बाद केला असल्याचे जाहीर केले.
याठिकाणी फक्त दोनच जणांनी अर्ज दाखल केल्याने भाजपचे नितीन जयराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने ते बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.
भाजपकडून बिनविरोध होऊन विजयी सलामी दिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. नितीन पाटील याना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी यांनी शुभेच्छा दिल्या.
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीतील हा विजय महायुतीच्या विजयाची नांदी आहे. नितीन पाटील यांनी पनवेलची सेवा केली आहे. हा विजय म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. भाजपचे या निवडणुकीमध्ये खाते उघडले आहे. याच्या पुढचा विजय अतिशय देदीप्यमान असेल. नितीन पाटील यांचे खूप खूप अभिनंदन! पुढील काळात पनवेलच्या विकासासाठी अधिक ताकदीने काम करू.
-प्रशांत ठाकूर, आमदार
RamPrahar – The Panvel Daily Paper