कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी परिसरात गुढीपाडवा साजरा होताना संध्याकाळी जोरदार पाऊस आला होता. त्याआधी एक तास वादळी वार्याने परिसरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली होती. त्या वादळात भाजीपाला शेतीचे मळे उद्ध्वस्त झाले, तर वेलीवर होत असलेल्या भाजीपाल्याचे मांडव कोसळले होते. शेतकर्यांनी तेथे माल ठेवण्यासाठी तयार केलेल्या झोपड्यादेखील कोलमडून गेल्या होत्या.
झुगरेवाडी परिसरात चई, चेवणे, गोरेवाडी, भोपळेवाडी, झुगरेवाडी, नांदगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती करतात. त्या भागात तब्बल 100 एकर जमिनीवर शिमला मिरची, तिखट मिरची, काकडी, मका, कारली, डांगर, चवळीची शेती केली आहे. त्यात तब्बल 70 एकर जमिनीवर शिमला मिरचीचे पीक घेतले जाते. शेतात पिकणारा माल थेट नवी मुंबईत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील घाऊक व्यापारी शेतात येऊन नेतात. यावर्षी हे पीक जोमात होते. कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजवला असतानाही जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ खुली असल्याने
शेतकर्यांना कोरोनाचे टेन्शन नव्हते, पण निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही. चांगले पीक आल्यामुळे शेतकरी खूश होते, मात्र गुढीपाडवा साजरा होत असताना सायंकाळी त्या परिसरात वादळी वार्यासह पाऊस बरसला. त्यात झालेल्या नुकसानीमधून शेतकरी सावरत असतानाच 29 आणि 30 एप्रिल रोजी आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने सर्व शेतकरी संकटात आले आहेत.