मूळ राज्यात परतण्यासाठी नावनोंदणी कुठे करायची, टप्प्याटप्प्याने कशा तर्हेने त्यांची प्रवासाची व्यवस्था केली जाणार आहे या सार्या बाबतची माहिती जितक्या लवकर आणि नि:संदिग्धपणे स्थलांतरित मजुरांपर्यंत पोहोचेल तेवढ्याच गोंधळाच्या घटना टाळता येतील. या मजुरांच्या प्रवासाच्या खर्चाचेही राजकारण केले जाते आहे. या सार्यातून निव्वळ संभ्रमच वाढेल व त्यातून अशिक्षित, भांबावलेल्या, गरीब जनतेकडून हिंसक वर्तन घडण्याची शक्यताच वाढते. हे सारे टाळलेच पाहिजे.
देशात सोमवारपासून लॉकडाऊन 3.0 सुरू झाला. हा तिसरा लॉकडाऊन 17 मेपर्यंत सुरू राहणार असला तरी कोरोनाच्या प्रादुर्भावानुसार जाहीर करण्यात आलेल्या ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये परिस्थितीनुसार काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सवलतींमुळे पुन्हा कोरोना केसेसची मोठी लाट येऊ नये म्हणून सरकारकडून सावधपणे आवश्यक तेवढीच औद्योगिक व आर्थिक क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. परंतु सोमवारी देशात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडालेला दिसला. महसुली उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने तिन्ही झोन्समध्ये दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने देशात अनेक ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून या दुकानांसमोर लोकांच्या रांगा दिसून आल्या. यात काही ठिकाणी लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले तर काही ठिकाणी पोलिसांना लाठीचा प्रसाद देऊन लोकांना अंतर राखून उभे राहण्यास भाग पाडावे लागले. वृत्तवाहिन्यांवर सकाळपासून ‘तळीरामांच्या रांगां’च्या बातम्या झळकू लागल्याने राज्यात जणु काही कोरोना संकट संपुष्टात आल्यासारखे भासू लागले. तळीरामांच्या या गर्दीपाठोपाठच बातम्या आल्या त्या मजुरांच्या गर्दीच्या. उत्तर भारतात परतू इच्छिणार्या मजुरांनी पुण्यात वारजे येथे तोबा गर्दी केली तर सुरत येथे मजुरांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने पोलिसांना अश्रुधुराची नळकांडी फोडावी लागली. देशात लॉकडाऊन अद्याप कायम असून कोरोनाचे संकट पुरते आटोक्यातही आलेले नाही असे असताना निव्वळ काही सवलती दिलेल्या असताना नागरिकांचे बेजबाबदार वर्तन हे भविष्यातील परिस्थितीबाबत चिंता निर्माण करणारे आहे. स्थलांतरित मजूर आपापल्या मूळ राज्यात परतण्यासाठी आतुर झाले आहेत हे खरे आहे. परंतु सगळ्यांच्याच प्रवासाची सोय लगेच होऊ शकत नाही हे वास्तव त्यांच्यापर्यंत सुस्पष्टपणे पोहोचवण्याची गरज आहे. कोरोना संकटासारखी परिस्थिती आपल्यापैकी कुणीच या आधी अनुभवलेली नाही. या विषाणूबद्दल अद्याप शास्त्रज्ञ आणि वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनाही पुरती माहिती नाही. उणेपुरे पाच-सहा महिने आपण कोरोनाला जाणतो आहोत आणि त्याचे नित्य नवे प्रकार आणि माहिती तज्ज्ञांच्या चिंतेतही भर घालते आहे. दुसरीकडे गेले जवळपास तीन महिने अवघे जगच जणू ठप्प झालेले असताना सगळ्याच देशांसमोर मोठे आर्थिक प्रश्न आ वासून उभे आहेत. निरनिराळ्या स्तरांवरच्या सरकारी यंत्रणांना खर्च कसे भागवायचे असा प्रश्न पडतो आहे. भारतासारख्या विकसनशील देशाच्या संदर्भात तर कोरोनामुळे नाही तर भुकेमुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडतील अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे आर्थिक गरजेतूनच आपण सध्याच्या तिसर्या लॉकडाऊनच्या काळात काही गोष्टी खुल्या केल्या आहेत. पण सवलतींच्या या काळात सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन न केल्यास साथीच्या प्रादुर्भावाची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढते असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. तो गांभीर्याने न घेतल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल.