Breaking News

पनवेल मनपाला ‘अमृत 2’ साठी केंद्राकडून 425 कोटी मंजूर

लवकरच निधी उपलब्ध; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची माहिती

पनवेल : प्रतिनिधी  
पनवेल महापालिकेतील ‘अमृत 2’ या अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 424 कोटी 17 लाख रूपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. याबाबत 20 सप्टेंबरपर्यंत शासकीय निर्णय मंजूर होऊन पनवेल महापालिकेला निधीही उपलब्ध होईल, असा विश्वास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण महापालिका निर्माण झाली. आता या महापालिका हद्दीत सर्व पद्धतीच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठीदेखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत योजनेचा फायदा पनवेल महापालिका हद्दीला करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण भागात पाणीपुरवठा तसेच सांडपाण्याच्या निचरा करण्यासाठी जसा पुढाकार घेतला आहे, त्याच पद्धतीने भविष्य काळात शहरांमधील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी अमृत योजनेचा फायदा पनवेल महापालिकेला मिळेल, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे देखील पुढाकार घेतील असा आम्हाला विश्वास आहे, असे परेश ठाकूर या वेळी म्हणाले.
पनवेल महानगरपालिकेच्या ‘अमृत 2’ या अभियानांतर्गत चार प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पहिल्या प्रकल्पात, पमपा क्षेत्रातील 29 गावांकरीता होणार्‍या पाणीपुरवठा योजनेंतर्गत माणशी 135 लिटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी 154 कोटी 49 लाख रूपये मंजूर केले आहेत. दुसर्‍या प्रकल्पानुसार पमपा क्षेत्रातील 29 गावांकरीता मलनि:स्सारण योजनेतील मलनि:स्सारण वाहिन्या टाकणे आणि मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्र बांधणे. यासाठी 206 कोटी 75 लाख रूपये मंजू करण्यात आले आहेत. तिसर्‍या प्रकल्पानुसार पनवेल शहरासाठी (15.50 दलली चा) अतिरिक्त एसटीपी. प्लांट बांधण्यासाठी 52 कोटी 20 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. चौथ्या प्रकल्पानुसार पमपा क्षेत्रातील पिसार्वे गावातील तलावाचे सुशोभीकरण करणे, गाळ काढणे आणि पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी 13 कोटी 73 लाख रूपये केंद्राकडून मंजूर करून घेण्यात आले आहेत, असेही परेश ठाकूर यांनी यावेळी सांगितले. एखाद्या प्रकल्पासाठी केंद्र सरकार जेव्हा निधी उपलब्ध करून देते तेव्हा राज्य सरकारलाही आपला वाटा द्यावा लागतो. आताच्या बदललेल्या परिस्थितीत राज्य सरकारही आपला वाटा देईल. तसेच महानगरपालिकाही आवश्यक तो हिस्सा निश्चितच भरेल, अशी ग्वाहीदेखील परेश ठाकूर यांनी दिली.

विकासाची गंगा पुढे नेण्याच्याच हेतूने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गेले तीन वर्षे रखडलेला अमृत प्रकल्प पुन्हा मंजूर करून घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे पनवेल महानगरपालिकेतर्फे मी आभार मानतो, महापालिकेमार्फत हे सर्व प्रकल्प वेगाने राबविले जावेत याची खबरदारी आम्ही यापूर्वीच घेतली आहे, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनासाठी पमपा आणि आम्ही सारे लोकप्रतिनिधी जनतेसाठी काम करीत राहू.
-परेश ठाकूर, माजी सभागृह नेते, पमपा

अमृत योजनेतून आमच्या धाकटा खांदा, मोठा खांदा गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाइन टाकण्यात आली आहे. शहरात पाच ठिकाणी पाण्याच्या टाक्याही बांधून झाल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्यांची मेन लाइनला जोडणी केल्यावर धाकटा खांदा, मोठा खांदा साईनगर, ठाणा नाका परिसरातील लोकांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल.
-मनोहर म्हात्रे, माजी नगरसेवक

पनवेल महापालिका झाल्यावर आमच्या गावचा समावेश महापालिकेत झाला. येथील नागरिकांची वस्ती वाढू लागल्याने लोकांनी चांगल्या बिल्डिंग बांधल्या आहेत. आजूबाजूला सिडकोची हद्द आहे. तेथील सिव्हरेज लाईन प्रमाणे आपल्याकडे ही आरोग्याच्या दृष्टीने सिव्हरेज लाइन होणे गरजेचे आहे ही त्यांची रास्त अपेक्षा आहे. महापालिकेतर्फे ‘अमृत 2’ या अभियानंतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पात त्याचा समावेश झाल्याने भविष्यकाळात सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी आम्हाला त्याचा फायदा होईल.
-शशिकांत शेळके, माजी सरपंच, आसूडगाव

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply