Breaking News

टचाईच्या झळा वाढू लागल्या

भडवळवाडीत दोन्ही विहिरी कोरड्या, एक कोसळली

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील भडवळ ठाकूरवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तेथे असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या असून आदिवासी ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करून खाजगी फार्महाऊसमधील पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. त्यात भर म्हणून या वर्षी पावसाळ्यात तेथील एका विहिरीचा कठडा कोसळला असल्याने पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे.

नेरळजवळ दामत ग्रामपंचायतमध्ये भडवळ गाव असून त्या गावापासून डोंगरात भडवळवाडी वसली आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले या आदिवासी वाडीतील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी दोन ठिकाणी विहिरी खोदल्या आहेत. 45 घरांची वस्ती असलेल्या या ठाकूरवाडीत असलेल्या नवीन विहिरीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने विहिरीमधून पाणी गळती होत असते. त्यामुळे ती विहीर असून देखील काहीही फायदा ग्रामस्थांना नाही, कारण त्या विहिरीत जानेवारी महिन्यात एक थेंब पाणी साठून राहत नाही, तर तेथे वरच्या भागात असलेल्या जुन्या विहिरीचा कठडा 2018च्या पावसाळ्यात कोसळला आहे. त्यामुळे भडवळ ठाकूरवाडीमधील दोन्ही विहिरी बिनकामाचा झाल्या आहेत. त्यामुळे त्या वाडीत पाणीटंचाई जाणवू लागली आहे, परिणामी पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी आदिवासी महिलांना डोक्यावर हांडे घेऊन दोन किलोमीटर अंतरावर जाऊन खाजगी फार्महाऊसवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. फार्महाऊस मालक देखील आदिवासी लोकांना पाणी देत असल्याने त्यांची गैरसोय काही प्रमाणात करीत आहेत, परंतु आदिवासी लोकांना उन्हं अथवा कोणतीही वेळ न पाहता पायपीट करून पाणी घरापर्यंत आणावे लागत आहे.

भडवळवाडीला पाणी मिळावे यासाठी या वाडीचा समावेश दामत-भडवळ नळपाणी पुरवठा योजनेत केला आहे. या नळपाणी योजनेच्या पाईपलाईन देखील टाकून झाल्या आहेत, पण पाण्याचा दाब कमी असल्याने वाडीपर्यंत पाणी पोहचत नाही. कधी तरी नळाचे पाणी भडवळ गावाच्या टेकडीच्या मागे पोहचत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या आदिवासी लोकांच्या जीवनात दररोज पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायत मे महिन्यात ट्रँकरच्या माध्यमातून पाणी पिरविते, मात्र दरवर्षी मार्च महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असल्याने आदिवासी लोक या पाणीटंचाईला कंटाळले आहेत.

आमच्या वाडीत नळपाणी योजनेचे पाईप टाकले आहेत, पण नळाला पाणी येत नाही. दुसरी बाब म्हणजे वाडीत असलेल्या दोन विहिरीपैकी एका विहिरीचा कठडा कोसळला आहे. याची माहिती ग्रामपंचायतीकडून दिलेली असताना देखील पंचायत समितीकडून दुरुस्तीचे कोणतेही काम झाले नाही, तर अन्य एका विहिरीत पाणी साठून राहत नसल्याने पाणी वाडीत कसे मिळणार? याचे उत्तर आदिवासी लोकांना मिळेल का?

-वामन वाघ, ग्रामस्थ

भडवळवाडीमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला सूचना दिल्या आहेत. विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाला देखील सूचित करण्यात आले आहे. -बालाजी पुरी, बीडीओ, कर्जत

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply