नवी दिल्ली ः भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर शंका उपस्थित करणार्या काँग्रेस नेत्यांवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलावर काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास नाही. सुरक्षा दलांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी काँग्रेस नेते कपिल सिब्बल, पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह यांच्यावर टीकास्त्र सोडलं. इंग्रजीतील विद्वानांचा भारतीय लष्करावर विश्वास नाही, असा टोला त्यांनी पी. चिदंबरम यांना लगावला. दिग्विजय सिंह हे 10 वर्षे मुख्यमंत्री होते, मात्र आज ते ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत, ते ऐकून दुःख होतं. पुलवामा हल्ल्याची तुलना त्यांनी अपघाताशी केली. त्यांची वैचारिक पातळी घसरली आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सुरक्षा दलांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे, असंही ते म्हणाले. हे लोक भारतीय निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करणार्यांकडे पुरावे मागत नाहीत, मात्र लष्कराच्या शौर्यानंतर पुरावे मागतात, असंही ते म्हणाले. एअर स्ट्राईकमध्ये 250हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिली होती. त्याबाबतही प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिलं. शहा यांनी अंदाज वर्तवला होता. आमचा लष्करावर आणि हवाई दलावर विश्वास आहे. एअर स्ट्राईक किती प्रभावी होता याचे पुरेसे पुरावे आमच्याकडे आहेत, असंही प्रसाद यांनी सांगितलं.