खोपोली : बातमीदार
शासकीय कामासह अनेक ठिकाणी महत्त्वाचा ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणारे आधार कार्ड सध्या तळीरामांचा आधार बनले असून, खालापूर तालुक्यात बाहेरील तळीरामांचा वावर वाढल्याने मद्यविक्री दुकानदारांनी ‘आधार’सक्तीचा निर्णय घेतला आहे.
कोरोनो विषाणूच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांची अन्न-पाण्यासाठी शिकस्त सुरू असताना दुसरीकडे मद्यविक्री बंद झाल्याने तळीरामांची तडफड सुरू होती. शासनाने तिसरा लॉकडाऊन जाहीर करताना झोननुसार नियमात शिथिलता दिली. यामध्ये रायगड जिल्ह्यातील काही भागात 40 दिवसांनंतर उघडलेल्या मदिरालयासमोर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी सामाजिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसांनंतरही तळीरामांची गर्दी वाढतच असल्याचे चित्र दिसले. खालापूर तालुक्यालगत असलेल्या पनवेल, उरणमध्ये अद्याप मद्यविक्री बंद असल्याने या भागातील तळीरामांनी आपला मोर्चा खालापूरकडे वळविला आहे. त्यामुळे मोहोपाडा व चौक भागातील मद्यविक्री दुकानांत दारू खरेदीसाठी झुंबड उडाली. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यात बाहेरून येणार्यांना पायबंद बसावा यासाठी मद्य खरेदी करताना आधार कार्ड दाखविणे सक्तीचे करण्यात
आले आहे. दरम्यान, पनवेल, उरणमधून आल्यानंतर रिकाम्या हाताने परत जाण्यापेक्षा खालापुरातील आधार कार्डधारकाला काही कमिशन देऊन मद्यखरेदीचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावर आता काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.