पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 10) कोरोनाचे 14 नवीन रुग्ण आढळले, तर 20 जणांनी कोरोनावर मात करून सुखरूपपणे घरी गेले आहेत. नव्या रुग्णांमध्ये शहरी भागातील खारघर येथील सहा, कामोठे पाच आणि पनवेल व कळंबोलीतील प्रत्येकी एक अशा 13 जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागात उमरोली येथे एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णांपैकी पाच जण खारघरमधील एकाच कुटुंबातील आहेत. नव्या रुग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या 156 झाली. तालुक्यातील रुग्ण 204 झाले, तर उरण तालुक्यातील करंजा येथील 21 आणि महाडमधील एक असे रुग्ण मिळून जिल्ह्यातील एकूण आकडा 250वर पोहचला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर सेक्टर 4 येथील साई मन्नत बिल्डिंगमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा कुटुंबप्रमुख मुंबईला सेबीमध्ये काम करीत असून, त्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली आहे. खारघर सेक्टर 21 तपोवन सोसायटीमधील 49 वर्षीय व्यक्ती एपीएमसी फ्रूट मार्केटमध्ये काम करते. तिला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. कामोठे सेक्टर 5 मधील मारुतीधाम सोसायटीतील दोन व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोन्ही व्यक्ती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मानखुर्द शाखेत काम करीत आहेत. कामोठे सेक्टर 21मधील गौरीशंकर सोसायटीतील पोलीस कर्मचार्याच्या कुटुंबातील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी त्या पोलीस कर्मचार्याला कोरोना झाला आहे. कामोठे सेक्टर 36 येथील सूरज कॉम्प्लेक्समध्ये राहणार्या आणि मुंबईच्या केईएम रुग्णालयात नर्स असलेल्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
कळंबोली सेक्टर 4 गुरुव्हीला कॉम्प्लेक्समध्ये राहणार्या आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्स असलेल्या महिलेला कामाच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पनवेलमधील मध्यवर्ती भागात असलेल्या जोशी आळीतील सहयोग नगरात राहणार्या व दादरच्या अदि फार्मासीत कामाला असणार्या व्यक्तीला कोरोनाची बाधा
झाली आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील 1425 जणांची रविवारपर्यंत कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी 27 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाहीत. पॉझिटिव्हपैकी 80 जणांवर उपचार सुरू असून, 69 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये रविवारी उमरोली गावात एक कोरोना रुग्ण आढळला आहे. ही व्यक्ती मुंबईहून आपल्या गावाला आली होती. आतापर्यंत ग्रामीणमध्ये कोरोनाच्या 48 रुग्णांपैकी सात जण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णांमुळे चिंता व्यक्त होत आहे.