Breaking News

उत्सुकता आणि चिंता

देशातील तिसर्‍या लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा सोमवारी सुरू झाला. हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत चालणार असल्याने ‘पुढे काय’ची सावध उत्सुकता सर्वदूर आहेच. सोमवारची सुरुवातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने झाली. दिवसाअखेरीस पंतप्रधानांनी लॉकडाऊनमधील शिथिलतेचे संकेत दिले असले तरी ग्रामीण भागाला कोरोनाबाधेपासून दूर ठेवण्याच्या त्यांच्या आवाहनाकडेच अधिक लक्ष द्यावे लागेल.

कोरोनाच्या फैलावामुळे गेले सुमारे दोन महिने प्रवासी वाहतूक बंद ठेवल्यानंतर रविवारीच रेल्वेने प्रवासी गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. रेल्वेच्या संकेतस्थळावर सोमवारपासून ऑनलाइन तिकिटे उपलब्धदेखील झाली. अर्थातच हे सारे उन्हाच्या प्रचंड काहिलीनंतर वार्‍याची हलकीशी झुळुकही सुखावते तसेच आहे. रेल्वेकडून मंगळवारपासून सुमारे 30 विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. अर्थातच या नव्या प्रवासी वाहतुकीत बरेच काही बदललेले असेल. प्रवाशांना तब्बल 90 मिनिटे आधी रेल्वेस्थानकात पोहचावे लागेल. तसेच स्वत:चे खाणेपिणे, अंथरूण-पांघरूणही घरूनच आणावे लागेल. रेल्वेप्रवासाच्या या आनंदाच्या

बातमीपाठोपाठ देशातले सोमवारचे कोरोनाबाधितांचे आकडे आजवरचे सर्वाधिक असल्याचेही समजले. तब्बल 4213 नव्या केसेसची भर पडल्याने देशभरातील आजवरच्या कोरोना केसेसचा आकडा सोमवारी 67 हजार 152 इतका झाला, तर मृतांची संख्या 2206वर जाऊन पोहचली. दुर्दैवाने महाराष्ट्रच आजही सर्वाधिक बाधित राज्य असून राज्यातील कोरोना केसेसची संख्या 22 हजार 171 इतकी आहे. दुसर्‍या क्रमांकावरील गुजरातमध्ये 8 हजार 194 केसेस आहेत, मात्र देशातील कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही जवळपास जागतिक रिकव्हरी रेट इतकेच आहे. आजच्या घडीला देशातील 20 हजार 917 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 44 हजार 029 रुग्णांना अ‍ॅक्टिव्ह केसेस म्हणता येईल. देशातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता 31.15 टक्क्यांवर पोहचले आहे. एप्रिलच्या 10 तारखेला हे प्रमाण अवघे 10.3 टक्के इतके होते. एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना एक तृतीयांश रुग्ण बरे झालेले आहेत ही माहिती निश्चितच बळ देते. दुसरीकडे देशातील कोरोना केसेस दुप्पट होण्याचा दर मात्र खाली घसरल्याने चिंता वाढली आहे. 3 मे रोजी हा दर 11.5 दिवस होता, तर आता तो 10.6 वर आला आहे. अर्थात बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या यांचे प्रमाण 9:1 असे असल्यानेही यंत्रणेला दिलासा वाटत आहे. कोरोनामुळे देशात 10 रुग्ण दगावतात तेव्हा 90 जण बरे झालेले असतात, असा याचा अर्थ होतो. अशाच काही दिलासादायक तपशिलांमुळेच सरकार सावधपणे का होईना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणू धजावते आहे. आतापावेतो 468 विशेष गाड्यांमधून पाच लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यांत पोहचवले गेले आहे, तर वंदे भारत मिशनअंतर्गत 23 हवाई फेर्‍यांमधून सुमारे चार हजार भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. या अशा उपाययोजनांपाठोपाठ 17 तारखेनंतर लॉकडाऊन पुढे सुरू राहणार की त्यात काही मोठ्या सवलती मिळणार हे सोमवारी पार पडलेल्या पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चेतूनच ठरणार आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याचे संकेत पंतप्रधानांनी दिले असून मात्र तसे करतानाच ग्रामीण भागांना कोरोनाबाधेपासून दूर ठेवण्यासही त्यांनी बजावले आहे, हेही लक्षात ठेवावेच लागेल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply