पाली : प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळा सोनेवाडी इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांच्या तीस वर्षानंतरच्या गेट-टुगेदरने आठवणींना उजाळा मिळाला. बालपणीचे अविस्मरणीय क्षण तसेच सुंदर आठवणी बालपणात घेऊन गेलेले क्षण या वेळी अनुभवायास मिळाले. पालीतील दीपा लक्ष्मण काळे व राजेश्री चौधरी यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून बालपणीचे 18 मित्र एकत्र आले व त्यांनी धम्माल मस्ती केली.
या वेळी लोककल्याणकारी व जनहितार्थ काम करताना अनाथ मुले व वृद्धांना मायेचा आधार देण्याचा संकल्प या ग्रुपने एकदिलाने केला. पुढच्या गेटटूगेदर ला प्रत्येक्ष संकल्पातील कृतिशील कामाची मांडणी देखील करू असे यावेळी ठरविण्यात आले. 32 वर्षानंतर एकमेकांना पाहतांना ते हास्य डोळ्यातले अश्रू बालपणातले सुंदर जगात घेऊन गेले.
अभ्यासात मागे होते ते नामवंत उद्योजक झाले. तर अभ्यासात हुशार असलेले विद्यार्थी कुणी शिक्षक, कुणी वकील, कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी व्यवसायिक, कुणी शेतकरी आणि सरपंच झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. सर्वांनी मिळून देश व राष्ट्राप्रती सामाजिक बांधिलकी जपताना आपले कर्तव्ये म्हणून आपण समाजातील अनाथ मुले व वृद्धाश्रमातील वृद्ध यांच्यासाठी मायेचा हात व आधार देण्याचा संकल्प या कार्यक्रमात करण्यात आला.