नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे व्यापार, उद्योगक्षेत्रांमधे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल येथील आर्थिक सल्लागार व फोनिक्स वेल्थ मॅनेजमेंट्सच्या सर्वेसर्वा दिपाली जोशी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र व बडोदा आदी भागातील अनेक व्यावसायिकांनी याचा लाभ घेतला. कोरोनानंतर जगातील उद्योग व व्यापारक्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल घडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जगाचेे प्रोडॉक्शन फॅक्टरी असलेल्या चीनची विश्वासार्हता आता कमी झालेली आहे. जगातील अनेक देश चीनमधून आपलेे प्लॅन्टस् बाहेर काढत आहेत. जपान सरकारने आपल्या देशातील व्यावसायिकांना 2:2 बिलियन डॉलर्सचे पॅकेज यासाठी जाहीर केलेले आहे. या सर्वांसाठी भारत हा उत्तम पर्याय असणार आहे. आपल्याकडे मनुष्यबळ व तंत्रज्ञान विपुल प्रमाणात असून कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. भारत सरकार यासाठी सहाय्य करत आहे. रिझर्व बँकेने 50 हजार कोटी नाबार्ड, सीडबी, नॅशनल हौजिंग या माध्यमातून जाहीर केलेले आहेत. यातून लघु व मध्यम उद्योगानाही चालना मिळणार आहे.
आर्थिक गुंतवणुकीबाबतही त्यानी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, किमान एक वर्षाचा फंड शिल्लक ठेवूनच सावधपणे व सल्लागारांच्या सल्ल्यानेच शेअरमधे गुंतवणूक करावी. भांडवली गुंतवणुक कमी प्रमाणात करावी. यापुढे हेल्थ, फार्मासिटिकल, ईकॉमर्स, ऑनलाईन एज्युकेशन, सॉफ्टवेअर, कन्सल्टंट, डिजिटल एंटरटेनमेंट, आय.टी. इक्विपमेंट, पॅकेज फुड आदी उद्योग जोमाने चालणार असून त्यामधे ज्ञान व कौशल्य विकसित करण्याचा सल्ला दिपाली जोशी यांनी दिला.