पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेणारे आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात परेश ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात दिलेल्या पत्रातून गणेश देशमुख यांच्या बदलीला विरोध दर्शवून सक्षम अधिकारी म्हणून देशमुख यांनी केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला आहे.
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाभयंकर कोरोना संकट, तसेच पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधक कामे, आरोग्य विभागांतर्गत शहरातील स्वच्छतेची कामे, महानगरपालिका क्षेत्रामधील होणारी नागरी सुविधा अंतर्गत 71 गावांमधील स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे, स्वच्छता अभियान, पनवेल शहरातील पाणीपुरवठा योजना अर्थात अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रस्तावित असलेली आठ हजार झोपडपट्टीधारकांची पुनर्वसन योजना, सिडकोकडून महानगरपालिकेला होणारे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक भूखंडांचे हस्तांतरण अशा योजनांना खीळ बसून पनवेल या नवजात महानगरपालिकेचा बोजवारा उडून जनतेमध्ये हाहाकार माजेल व शासनाबद्दल जनतेमध्ये अविश्वास निर्माण होईल.
आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याकरिता योग्य पद्धतीने उपाययोजना करून महापालिकेचे उत्पन्न वाढविले तसेच त्यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनासारख्या रोगावर अतिशय योग्यरित्या उपाययोजना राबविल्याने महापालिका क्षेत्रात कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. पनवेल महापालिकेत पूर्वी कचर्याची नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत होती, परंतु आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेची सूत्रे हातात घेतल्यापासून कचर्याच्या समस्येवर पूर्णपणे नियंत्रण आले असून, सध्या योग्य पद्धतीने कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी पावसाळ्यापूर्वीची होणारी नालेसफाई व पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये याकरितादेखील गणेश देशमुख यांनी अतिशय उत्तमरित्या कामे केली आहेत, असे परेश ठाकूर यांनी पत्रात म्हटले आहे.
गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त झाल्यापासून नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील गावांना स्मार्ट व्हिलेज करण्यामागे त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. एकूणच देशमुख यांचे अधिकारी म्हणून कार्य उल्लेखनीय असून, त्यांची पनवेलकरांना गरज आहे. त्यामुळे विकासकामे पूर्णत्वास नेण्याकरिता आणि पनवेलकरांची भावना लक्षात घेता किमान डिसेंबर 2020पर्यंत बदली रद्द करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करून गणेश देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …