Breaking News

…अन्यथा 4 मेपासून पनवेल बंद ः आ. प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेलहून मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी जात असलेल्यांपैकी काहींना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 80 टक्के हेच कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे पनवेल परिसरावर मोठ्या संकटाचे ढग पसरले आहेत. शासनाने उद्योजकांना जो नियम लावला आहे, त्याचप्रमाणे या कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे. त्याचा मुख्यमंत्री महोदय आणि बीएमसीने विचार करून तातडीने पावले उचलली नाहीत, तर 4 मेपासून पनवेलमधील सर्व व्यवहार बंद करावे लागतील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 1) फेसबुक लाइव्हरून पनवेलकरांशी संवाद साधताना सांगितले.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी फेसबुक लाइव्हवरून पनवेलकरांशी संवाद साधताना सगळ्यांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन कोरोनाबाबत जगातील आणि देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. या संकटकाळात देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी खर्‍या अर्थाने पित्याच्या भूमिकेतून कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत. त्यांना आपण सारे लॉकडाऊनचे नियम पाळून सहकार्य करीत आहेत. आम्ही या काळात रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांना आणि येथील झोपडपट्टीत राहणार्‍या 12,500 नागरिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य अनेकांच्या सहकार्यामुळे वाटप केले आहे. आता ज्यांच्याकडे केशरी रेशनकार्ड आहे त्यांना आणि रेशनकार्ड नसलेल्यांनाही धान्यवाटप केले जाणार आहे. महापालिका क्षेत्रात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी कम्युनिटी किचन सुरू करून त्या माध्यमातून सुमारे 30 हजार लोकांना जेवण पुरवण्याची सोय केली आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.  
पनवेल महापालिका चांगले काम करीत असताना कोरोनाच्या रुग्णांची वाढणारी संख्या चिंता वाढवणारी आहे. पनवेलमध्ये आतापर्यंत 69 रुग्ण झाले. त्यापैकी परदेश प्रवास केलेले पाच, सीआयएसएफ जवान 11,
एअर पोर्टवरील ओला टॅक्सीचालक आणि त्याचे कुटुंब पाच, मुंबईत काम करणारे हॉस्पिटलमधील कर्मचारी 10, सफाई कामगार आणि पोलीस 11, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे आठ जण यांना कोरोनाचा संसर्ग झाला. हे सारे कर्मचारी स्वत:च्या जीवनाच्या एका टप्प्यावर झोकून देऊन कोरोनाविरुध्द लढत आहेत. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आपण सत्कारच केला पाहिजे. शासन उद्योजकांना आपल्या कामगारांची राहण्याची सोय कामाच्या ठिकाणी करा, असे सांगते मग पनवेल महापालिका हद्दीतील संक्रमण रोखण्यासाठी या कर्मचार्‍यांची राहण्याची सोय त्यांच्या कामाच्या ठिकाणीच करावी, अशी आम्ही मागणी केली असता त्याबाबत निर्णय घेतला जात नाही. पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांमुळे संक्रमण वाढत असताना शासनाने त्याकडे दुर्लक्ष करू नये, अशी आमची मागणी आहे. त्यामागे त्यांच्या कुटुंबीयांना दुखावण्याचा कोणताही हेतू नाही, तर त्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्यासाठीच ही मागणी केली आहे. हे आजच्या पनवेलमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संसर्गावरून दिसून येईल.
माझी आपणा सर्वांना विनंती आहे की कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी, त्याची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधानांनी 17 मेपर्यंत  लॉकडाऊन वाढवले आहे, पण पनवेलमधील संक्रमण रोखण्यासाठी शासनाने निर्णय न घेतल्यास आपण सगळ्यांनी मिळून आठवडाभर पनवेलमधील मेडिकल दुकाने आणि हॉस्पिटल सोडून सर्व व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे आणि कोरोनाला पनवेलबाहेर रोखून धरू या, असे आवाहनही त्यांनी या वेळी पनवेलकरांना केले.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply