Breaking News

नवी मुंबईत सोसायट्यांमध्ये येणार्यांची माहिती पालिकेला द्यावी लागणार

नवी मुंबई : बातमीदार – कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सोसायटीमध्ये बाहेरगांवाहून आलेल्या व्यक्तींची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेस त्वरित कळवावी लागणार आहे. कोविड विषाणूचा प्रसार नवी मुंबईत वाढत चालला आहे. त्यात छुप्या पद्धतीने मुंबईतून नवी मुंबईत येणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. कोविडचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच संसर्ग वाढवणारी साखळी तोडण्यासाठी पालिकेने कडक धोरण अवलंबले असून पालिकेने सतर्क राहण्याचे आदेश नवी मुंबईतील सर्व सोसायटी धारकांना दिले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सोसायटी पदाधिकारी यांना नागरिकांनी अधिक सतर्क राहावे लागणार आहे. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा सोसायटीमध्ये असलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त बाहेरून इतर कोणी व्यक्ती नव्याने आली असल्यास, मग तो सोसायटीतील रहिवाशी असेल, तरी त्याची माहिती महानगरपालिका प्रशासनास त्वरित द्यावी लागणार आहे. याधीच हे आदेश पालिकेने सोसायट्यांना दिले होते. मात्र तरीही सोसायट्यांकडून दिरंगाई होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास येत आहे.

ज्या व्यक्ती बाहेरुन नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दाखल होत आहेत, त्यांनी पुढील 14 दिवस घरातच अलगीकरण करायचे आहे. तसेच शासन आदेशानुसार ज्या व्यक्ती पोलीस  शासकीय यंत्रणेकडून रितसर ई पास, विशेष परवानगी घेऊन सोसायटीमध्ये दाखल होत आहेत त्यांची संपूर्ण माहिती नवी मुंबई महापालिकेस कळविणे सोसायटी पदाधिकार्‍यांची जबाबदारी असणार आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे, सोसायटीमधील ज्या व्यक्ती अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेर विशेषत्वाने मुंबई व इतर शहरांमध्ये जात आहेत. त्यांचे कामावर जाणे महत्वाचे असले तरी त्यांच्यामुळे कोरोनाची लागण त्यांचे कुटुंबिय व इतरांना होणार नाही हे देखील अत्यंत महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन अशा व्यक्तींनी कामावरून घरी आल्यानंतर स्वत:ला घरातील इतर व्यक्तींपासून अलगीकरण करून राहणे व इतर कामांसाठी घराबाहेर न पडणे बंदनकारक असणार आहे. अशा नागरिकांबाबत सोसायटी पदाधिकार्‍यांनी सतर्कता बाळगावी, असे सक्त आदेश पालिकेने सर्व सोसायटी धारकांना दिले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply