Breaking News

वाढता वाढता वाढे..!

देशभरात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात थैमान घालणार्‍या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सोमवारी (दि. 25) संपलेल्या 24 तासांमध्ये देशभरात सहा हजार 977 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे.
देशभरातील तब्बल 1 लाख 38 हजार 845 कोरोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 77 हजार 103 जण, उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आलेले 57 हजार 720 आणि आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चार हजार 21 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव
भारतात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तीन हजार 41 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांवर गेला आहे, तर मृतांची संख्या 16च्या वर पोहोचली आहे. सध्या राज्यात कोरोनाची लागण असलेले रुग्ण 33 हजार 988 आहेत. एकट्या मुंबईत 30 हजार 542 कोरोनाबाधित असून, त्यामधील 988 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारत जगातील ‘टॉप 10’ देशांमध्ये
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, भारत कोरोना संक्रमणाच्या बाबतीत टॉप 10 देशांच्या यादीत पोहोचला आहे. भारताने रुग्ण संख्येत इराणला (1,25,701) मागे टाकले. पहिल्या नऊ क्रमांकांवर अनुक्रमे अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान हे देश आहेत, तर भारतात कोरोनाचे 77 हजार 103 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आकडेवारीत भारत हा पाचव्या क्रमांकावर आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply