पनवेल महापालिकेच्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त
सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात व व्यवस्थितपणे होण्यासाठी संवाद व नियोजन करण्याच्या उद्देशाने पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 12) महापालिकेच्या वतीने बैठक घेण्यात आली. या वेळी गणेशोत्सवासाठी मंडळांना ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्यात येणार्‍या सुविधेची माहितीसह प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक गणोशोत्सव, गणेश सजावट स्पर्धा याविषयी माहिती देण्यात आली, तर पोलीस विभागाच्या वतीने विविध सूचना करून सहकार्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, डॉ. वैभव विधाते, संतोष वारूळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्यासह महापालिका अधिकारी, सिडको, पोलीस विभाग, विद्युत वितरण,तहसिल,गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी बोलताना आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देत असून शासनाच्या व महापालिकेच्या वतीने विघ्नहर्ता पुरस्काराचे आयोजन केले आहे. यामध्ये जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावे. विसर्जन घाटावर आरास करून महापालिकेच्या वतीने घाट स्वच्छ ठेवण्यात येतील. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी महापालिका कार्यक्षेत्रातील मिरवणूक निघणार्‍या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी अत्याधुनिक सिमेंटच्या मिश्रणाचा वापर करण्यात येईल. सार्वजनिक गणेश मंडळांच्या वीज वितरण विभागाच्या विविध तक्रारी आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वीज मंडळासोबत बैठक घेण्यात येण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले.
सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी, गणेश मंडळांनी स्टेज बनविताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. गणेशमूर्तीची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपले दोन स्वयंसेवक 24 तास मंडपामध्ये ठेवावे. मूर्तीची विटंबना होणार नाही याकडे लक्ष द्यावे तसेच ध्वनी प्रदुषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगून मंडळांनी आपल्या साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवावा. वेळेवर विसर्जन मिरवणूक काढून ती संपवावी व गणेश मंडळांनी पोलीस यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या वेळी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गणोशोत्सव काळात ट्राफिक वॉर्डन वाढविणे, कृत्रिम तलावांची संख्या वाढविणे, विसर्जन घाटांचे पुर्ननिर्माण करणे, विसर्जन घाटांचे सौंदर्यींकरण करणे तसेच पालिकेने स्वतःचे ब्रान्डिंग करण्याबाबत सूचना दिल्या.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने येणार्‍या विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी पर्यावरणपूरक गणोशोत्सवासाठी तयार केलेल्या सप्तसूत्रीची माहिती दिली तसेच सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती सजावट स्पर्धा, मूर्तीदान व कृत्रिम तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन या महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणार्‍या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याविषयी आवाहन केले.
प्रास्ताविकात उपायुक्त संतोष वारूळे यांनी गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी योजना अमलात आणून त्यानुसार वाहतूक पोलीस, पोलीस स्टेशन, अग्निशमन विभाग, मालमत्ता विभाग यांच्यामार्फत मंडप परवानगी देणे व गणेशोत्सव व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरिता केलेल्या नियोजनाची माहिती दिली तसेच यासाठी महापालिकेने https://pandal.maharts.com वेबसाईट तयार केली असून गणेश मंडळांनी या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी गणेश मंडळांनी गणेशोत्सव काळात त्यांना येणार्‍या विविध समस्या मांडल्या तसेच या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply