माणगाव ः प्रतिनिधी
कीटकसृष्टीतील सामूहिक वर्तन करणारा मधमाशी कीटक व त्यांचे पोळे जंगलातून नामशेष होत असून एप्रिल-मे महिन्यात मिळणारे मधाचे पोळे दिसेनासे झाले आहे.
पूर्वी समृद्ध अशा वनांमध्ये झाडांवर, कातळाच्या कड्यांना, झाडांच्या डोलीत मिळणारे मधाचे पोळे आता मिळेनासे झाले आहेत. वाढती वृक्षतोड, वणवे, कीटकनाशकांचा अतिवापर व वाढणार्या प्रदूषणामुळे मधमाशांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत.त्यामुळे पूर्वी जंगलातून सहजासहजी मिळणारे मधाचे पोळे जंगलातून लुप्त होत आहेत.
साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात ग्रामीण भागातील जंगलात मोठ्या प्रमाणात मधाचे पोळे सापडत. वसंत ऋतूत झाडांना आलेला फुलोरा व विविध पाण वनस्पतींच्या सान्निध्यात मधमाशा आपला अधिवास तयार करीत. त्यामुळे अनेक शेतकरी व आदिवासी बांधवांना सहजरीत्या मध मिळत होता, मात्र गेल्या काही वर्षांत जंगलातून मिळणारे मधाचे पोळे कमी झाले असून निसर्गसंपन्न असा हा कीटक दुर्मीळ होत आहे.
आयुर्वेदात गौरविलेले औषधी मध आरोग्यासाठी उपयुक्त आहे. जंगलातून सहज मिळणारे मध कमी झाल्याने निसर्गाचा हा ठेवा हरवत चालल्याची भावना स्थानिक बुजुर्ग व आदिवासी बांधव व्यक्त करीत आहेत. मधमाशा परागीकरणाचा सर्वांत मोठा स्त्रोत असतात. त्यांचे घटत जाणारे प्रमाण निसर्गासाठी हानिकारक असल्याचे मत निसर्ग अभ्यासक व्यक्त करीत आहेत.