नवनिर्मिती अडकली लालफितीत
पेण : प्रतिनिधी
येथील पोलीस कर्मचारी व अधिकार्यांच्या वसाहतींची दयनीय अवस्था झाली असून, काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने काही पोलीस कर्मचार्यांना या इमारतीत जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. तर काही कमर्चारी जीवाच्या भीतीने भाड्याच्या घरात राहत आहेत.
पेण तालुक्यात पोलीस अधिकार्यांसह सुमारे 128 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये पेण पोलीस ठाण्यात अंदाजे चार अधिकारी 57 कर्मचारी, वडखळ पोलीस ठाण्यात तीन अधिकारी 38 कर्मचारी आणि दादर पोलीस ठाण्यात दोन अधिकारी 24 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना कुटुंबासह राहण्यासाठी असलेल्या वसाहतीमध्ये पाच मोठ्या इमारती आणि दोन बैठ्या चाळी आहेत. त्या अतिशय जीर्ण झाल्या आहेत. या पाचपैकी फक्त एका इमारतीमध्ये कर्मचारी जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र काम करणार्या पोलिसांना आपल्या कुटुंबासमवेत राहण्यासाठी सुसज्ज् वसाहत लवकरात लवकर बांधण्यात यावी, अशी मागणी वारंवार सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.
पोलीस कर्मचारी वसाहतीमधील इमारतींची तपासणी सुरू आहे. त्याचा अहवाल लवकरच पूर्ण होईल. याबाबत वरिष्ठांसह पेण पोलीस ठाण्यातूनही पत्रव्यवहार झाला आहे. लवकरच पोलीस वसाहतीमध्ये नव्या इमारती बांधण्यात येतील.
-निरीक्षक देवेंद्र पोळ, निरीक्षक, पेण पोलीस ठाणे