पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील गडब येथील अवकाश संशोधनाचा विद्यार्थी प्रज्ञेश म्हात्रे या तरुणाने संशोधन मोहिमेत चार लघुग्रहांचे संशोधन केले आहे. सध्या देशभर लॉकडाऊन असले तरी ऑनलाइन अभ्यास सुरू आहेत. रिसर्च संस्थेचाही ऑनलाइन अभ्यास सुरू असल्याने या तरुणाने एप्रिल ते मे महिन्यात नासाकडून आयोजित केलेल्या इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅब्रेशन मोहिमेत सहभाग घेतला होता.
या मोहिमेत त्याला नियर अर्थ ऑब्जेक्ट व मेन बेल्ट अॅस्टिरॉइडमध्ये असलेल्या लघुग्रहांचे शोध घ्यायचे होते. त्याकरिता त्याला हवाई येथे स्थित असलेल्या प्यान-स्टार्स वेधशाळा व अॅरिझोना येथे स्थित असलेल्या क्यातलीना सर्व्हे वेधशाळेमधून शोध करण्याची संधी प्राप्त झाली. त्यात त्याला चार लघुग्रह शोधण्यात यश आले. त्याचा डेटा आता पुढील चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे.
या लघुग्रहांना स्वतःची नावे देऊन नामकरणासाठी रिसर्च संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. त्यांना मान्यता मिळाल्यास प्रज्ञेशच्या नावावर त्या लघुग्रहांचे नामकरण होईल. याशिवाय
लॉकडाऊन काळात अवकाश संशोधनासंबंधी त्याने 12 कोर्सही यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. प्रज्ञेश करीत असलेल्या संशोधनाबद्दल स्थानिक, राजकीय लोकप्रतिनिधी, तसेच गडब रहिवासी संघ पेणतर्फे व त्याच्या शांतीनिकेतन सोसायटीतील रहिवाशांनी त्याचे अभिनंदन केले आहे.