मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील महालोर, खारअंबोली येथील प्रत्येकी एक नागरिक कोरोनाबाधित आढळला आहे. एकदरा येथेही दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुरूड तालुका ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 12 जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील महालोर येथील 20 वर्षीय व्यक्ती मुंबई, अंधेरी येथून 12 मे रोजी आला होता. त्याला मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची स्वॅब चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील व्यक्तीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मुरूड शहरापासून हाकेच्या अंतरावर असणार्या एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील एक महिला मुंबई, कफ परेड (कुलाबा) येथून 18 मे रोजी आली होती. तिचीही स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. त्या वेळी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तिच्या संपर्कात असणार्या दोघांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.
मुरूड खारअंबोली येथे एक व्यक्ती मुंबईहून 15 मे रोजी आला. त्याला त्या वेळी होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर 25 मे रोजी तब्येत बिघडल्याने मुरूड ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर स्वॅब चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चारही कोरोना पॉझिटिव्हपैकी तीन रुग्ण हे अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आधीच दाखल केले आहेत. आता नव्याने आढळलेल्या रुग्णासही अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे. मुरूड तालुक्यात मुंबई व इतर ठिकाणांहून मोठ्या संख्येने चाकरमानी येत आहेत. त्यांनी प्रशासनाचे आदेश पाळून सुरक्षित राहणे व आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही घरातच राहणे महत्त्वाचे आहे. कोणाला सर्दी, खोकला, ताप असेल तर ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन तहसीलदार गमन गावित यांनी केले आहे.