पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागील 250 अधिवेशनांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. राज्यसभेची ही सत्रे म्हणजे एक विचारधारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या ऐतिहासिक 250 अधिवेशनानिमित्त त्यांनी सोमवारी (दि. 18) राज्यसभेला संबोधित केले. या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला, घडताना पाहिला. अनेक दिग्गजांनी या सदनाचे नेतृत्व केले ही बाब अभिमानास्पद आहे. आतापर्यंतचा राज्यसभेचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे, असेही मोदी या वेळी म्हणाले.
भारतातील एकता कायमच राज्यसभेत दिसली. स्थायीभाव आणि वैविध्य ही राज्यसभेची वैशिष्ट्ये आहेत. राज्यसभा ही देशाची विकासयात्रा आहे. अशी राज्यसभा कधीही भंग होणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. आपल्या राज्यसभेच्या गौरवशाली प्रवासात मला सहभागी होता आले याचा अभिमान वाटतो, असेही मोदींनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.
राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह देशाच्या संघराज्यीय रचनेचा आत्मा आहे. राज्यसभा काळानुसार स्वतःला जुळवून घेत आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलत गेली आणि या सभागृहाने बदलत्या परिस्थितीला आत्मसात करून स्वतःला जुळवून घेतले. आज या महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली हे मी भाग्य समजतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मी खासकरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या पक्षांचे कौतुक करेन. त्यांनी कायमच या सभागृहाची परंपरा पाळली. राज्यसभेच्या अध्यक्षांसमोर थेट उतरून आंदोलन केले नाही ही बाब विशेष आहे. थेट अध्यक्षांसमोर न जाताही या दोन्ही पक्षांनी त्यांची बाजू सभागृहात मांडली हे महत्त्वाचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन्ही पक्षांनी परस्परांत ठरवले होते की कोणतेही मुद्दे असले तरी गोंधळ घालण्यासाठी वेलमध्ये जायचे नाही. असा गोंधळ त्यांनी घातला नाही. तरीसुद्धा त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणताही अडथळा आला नाही. सभागृह हे संवादासाठी असले पाहिजे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाले तरी अडथळ्यांऐवजी संवादाचा मार्ग निवडायला हवा. इतर पक्षांनी त्यांच्याकडून ही शिकवण घेतली पाहिजे, असा सल्लाही पंतप्रधान मोदींनी सर्व पक्षांना दिला.
सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या सत्रात काही वादविवाद होतील, मात्र चांगल्या चर्चा व्हाव्यात, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.
दरम्यान, संसदेच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे 2019चे शेवटचे अधिवेशन असून, अत्यंत महत्त्वाचे आहे. या सभागृहाच्या माध्यमातून देशवासीयांसाठीही एक जागृतीची संधी बनू शकते. सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज योग्य पद्धतीने चालवण्यासाठी सर्व पक्षांचे सहकार्य मिळेल, अशी मला आशा आहे.