Thursday , March 23 2023
Breaking News

चवदार तळ्याचा स्मृतिदिन साजरा

महाड क्रांतिभूमीत भीमसागर; मान्यवरांकडून अभिवादन; विविध उपक्रम

महाड : प्रतिनिधी

चवदार तळे सत्याग्रहाच्या 92व्या स्मृतिदिनाकरिता ऐतिहासिक महाड क्रांतिभूमीत आलेल्या भीमसागराने बुधवारी (दि. 20) महामानवाला अभिवादन केले. या वेळी चवदार तळे येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता भीमसैनिकांनी एकच गर्दी केली होती. चवदार तळे तसेच संपूर्ण शहरात विविध संघटनांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

महाड शहरातील चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी सामाजिक समतेचा लढा उभारून तमाम दलित, शोषित, पीडितांना त्यांचा न्यायहक्क प्राप्त करून दिला. या सामाजिक समतेच्या लढ्याचा 92वा स्तृतिदिन बुधवारी महाडमध्ये विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांकडून उत्साहात साजरा करण्यात आला. महामानवाला अभिवादन करण्याकरिता संपूर्ण राज्यातून हजारो भीमसैनिक महाडमध्ये दाखल झाले होते. चवदार तळे आणि क्रांतिस्तंभ या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरिता भीमसैनिकांनी एकच गर्दी केली होती.

बुधवारी सकाळी समता सैनिक दलाच्या पथकाने शहरातून संचलन करीत बाबासाहेबांना अभिवादन केले. आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांनी अभिवादन सभा तसेच रॅली काढल्याने संपूर्ण महाड शहर भीमगर्जनेने दुमदुमून गेले होते. ज्या पायर्‍यांवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले, त्या ठिकाणीदेखील भीमसैनिकांनी गर्दी केली होती. चवदार तळे परिसरात लागलेल्या विविध प्रकारच्या स्टॉल्सवरही भीमसैनिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके, सीडी, गीतांच्या कॅसेट्स, छायाचित्रे, लॉकेट्स, प्रतिमा खरेदी करण्याकरिता गर्दी केली होती.

 रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जागेंद्र कवाडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे मनोजभाई संसारे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आदी मान्यवरांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बौद्धजन पंचायत समिती, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटना आदी संघटनांच्या अभिवादन सभा या वेळी झाल्या. भारत मुक्ती मोर्चाची ओबीसी परिषददेखील आयोजित करण्यात आली होती. किल्ले रायगड ते चवदार तळे अशी समता रॅलीही या वेळी काढण्यात आली.

विद्यार्थ्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक

भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी चवदार तळे सत्याग्रहदिनी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचरणी नतमस्तक होऊन अभिवादन केले, तसेच या पवित्र स्थळी हार, फुले अर्पण न करता वह्या-पुस्तके अर्पण करा, असा संदेश देणार्‍या विद्यार्थांचे त्यांनी कौतुक केले. यानंतर क्रांतिस्तंभ येथे जाऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजप महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, संदीप ठोंबरे, अक्षय ताडफळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply