उरण : रामप्रहर वृत्त
होळी तसेच धुलिवंदनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बच्चे कंपनीमध्ये खरेदीचा मोठा उत्साह दिसून येत असून, बाजारपेठा होळीच्या आगमनासाठी सजल्या आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारच्या पिचकार्या, रंग, मुखवटे अशा वस्तूंची ग्राहकांना भुरळ पडत आहे.
होळी, धुलिवंदन, रंगपंचमी हा सण म्हणजे ‘बुरा न मानो होली है’ म्हणत खेळला जाणारा आबालवृद्धांचा सण. या निमित्ताने आपापसातील वैर विसरून अनेकजण एकत्रित येऊन हा सण साजरा करण्याची जणू भारतीय परंपरा आहे. त्याचप्रमाणे या सणाला पौराणिक महत्त्व असल्याने हिंदू समाजात हा सण महत्त्वाचा मानला जातो.
सध्या बाजारपेठेत होळीच्या नैवेद्याचे पापड, फेण्या, कुरडया तसेच रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी नैसर्गिक रंगाच्या सोबतीला चिनी पिचकार्या बाजारात दाखल झाल्या आहेत. होळी उत्सवाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी असल्याचेही दिसून येते.
आठवड्याचा भरत असलेल्या बाजारात महिला वर्गामध्ये होळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली असून, त्याचबरोबर बाजारात चिनी पिचकार्या दाखल झाल्या आहेत. बच्चे कंपनीकडून त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. सध्याच्या महागाईच्या युगात भारतीय परंपरा जपण्यासाठी दैनंदिन खर्चात बचत करून हा सण साजरा करीत असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे.