Breaking News

वाहनबंदी कायद्याला हरताळ

रात्रीच्या अंधारात माथेरानमध्ये आणखी दोन ट्रक घुसले; नगरपालिकेचे उंटामागून घोडे

कर्जत : बातमीदार

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये वाहनांना बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून मालवाहू वाहने शहरात जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान नगरपालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनही या प्रकाराची दखल घेत नसल्याने सर्वांच्या मदतीने हा प्रकार सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याचे घोषित केले आहे. त्याआधी ब्रिटिश काळापासून माथेरानमध्ये वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रुग्णवाहिका वगळता माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना येथील लाल मातीच्या रस्त्यावर प्रवेश नाही. या वाहनबंदी आदेशाचे पालन सर्व शासकीय यंत्रणांकडून होत असते, मात्र मागील काही वर्षांत माथेरानमध्ये वाहने घुसवली जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात एका नगरसेवकाने पेव्हर ब्लॉकने भरलेला ट्रक मध्यरात्री माथेरानमध्ये आणला होता. त्यावर अश्वपाल संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर काही दिवस माथेरानमधील वातावरण गरम झाले होते. हे सुरू असताना माथेरान नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने नियोजन करून रुग्णवाहिकेचा अनधिकृत वापर होणार नाही आणि कोणतीही वाहने निर्बंध असलेल्या भागात प्रवेश करणार नाहीत याची काळजी घेण्यास सुरुवात केली. अश्वपाल संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर दस्तुरी नाका येथे माथेरान गावात रुग्णवाहिका येण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट कुलूपबंद केले गेले. नगरपालिकेनेही त्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती.

मात्र 13 मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य भरलेले दोन ट्रक दस्तुरी नाका येथील लोखंडी गेटचे कुलूप उघडून माथेरानमध्ये शिरले. याबाबत 18 मार्चपर्यंत कोणालाही कोणतीही माहिती नव्हती, मात्र एका आरटीआय कार्यकर्त्याने दस्तुरी नाका येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता 13 मार्च रोजी दोन ट्रक शहरात गेले असल्याचे उघड झाले. या फुटेजचा व्हिडीओ जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवून या कार्यकर्त्याने माथेरान पोलीस कायद्याची अंमलबजावणी करीत नसल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, माथेरान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 19 मार्च रोजी शहरात मालवाहतूक करण्यासाठी गेलेल्या दोन ट्रकवर गुन्हा नोंद केला आहे, मात्र त्याबाबत माथेरान पोलीस  प्रसारमाध्यमांना माहिती देत नाहीत. शहरात घुसलेल्या दोन ट्रकबद्दल नगरपालिका मुख्याधिकारी आणि प्रभारी पोलीस अधिकारी यांच्याकडून ‘नो कॉमेंट्स‘ अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

नगरपालिका कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. लोखंडी गेट बंद केले आहे. तरीदेखील असे प्रकार होत असतील तर ती गंभीर बाब आहे. माथेरानमध्ये सामानाची ने-आण करण्यासाठी रेल्वेने मालवाहू गाडी सुरू करावी.

-प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान गिरीस्थान नगर परिषद

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply