पनवेल : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस 2 जून रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ असंख्य नागरिक घेत आहेत.
खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच भाजपचे नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराय प्रकल्पग्रस्त सामाजिक मंडळाच्या वतीने शनिवारी (दि. 30) खांदा कॉलनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यास प्रतिसाद लाभला.
फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून झालेल्या या शिबिरास नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, नगरसेविका सीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत शेळके, शांताराम महाडिक, दत्तात्रेय खंडागळे, सचिन गायकवाड, अविनाश गायकवाड, दीपक जांभळे, मनोहर गायकवाड, रूपराव निंभाडे आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी एमजीएम कामोठे रक्तपेढीचे सहकार्य लाभले.
होमिओपॅथिक गोळ्यांचे आज ओवे कॅम्प येथे मोफत वाटप
पनवेल : प्रतिनिधी – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने रविवारी (दि. 31) सकाळी 10 वाजता ओवे कॅम्प येथील रहिवाशांना अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून होणार्या या उपक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत. त्यांना डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिकवण असल्याने ते नेहमीच समाजहिताचे कार्य करीत आले आहेत. त्यालाच अनुसरून व शिकवणीनुसार त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनसेवा हीच ईश्वरसेवा हा बोध घेत खारघर ओवे कॅम्प येथील रहिवाशांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आयुष मंत्रालयाने निर्देश दिलेल्या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
नवीन पनवेल येथे रक्तदान शिबिर
पनवेल : प्रभाग क्र. 16 आणि भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन पनवेल सेक्टर 2 येथील कर्नाटक संघ हॉलमध्ये सकाळी 9 वाजता हे शिबिर सुरू होणार असल्याची माहिती नगरसेवक संतोष शेट्टी यांनी दिली.
पनवेल : लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गरीब, गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शनिवारी महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 19मधील न्हावी आळी, शिंदेवाडा येथील गोरगरीब नागरिकांना सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका रूचिता लोंढे व प्रभाग अध्यक्ष पवन सोनी यांच्या हस्ते जीवनावश्यक अन्नधान्य तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्या अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
पनवेल : लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने महानगरपालिकेत स्वच्छतेचे काम करणार्या साई गणेश इन्टरप्रायझेसच्या 1900 स्वच्छता कर्मचारी व त्यांचे कुटुंब तसेच महापालिकेच्या 600 कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्या अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्या मोफत भेट देण्यात आल्या. मंडळाचे सचिव तथा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे गोळ्यांच्या बॉटल्स सुपूर्द केल्या. सोबत नगरसेवक नितीन पाटील व नगरसेविका रूचिता लोंढे.
उरणमध्ये आज रक्तदान शिबिर
उरण : वार्ताहर – कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भाजप युवा मोर्चा उरणच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 31) उरणमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
जेएनपीटी टाऊनशिप मल्टिपर्पज हॉल येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार असून, या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार महेश बालदी, भाजपचे उरण तालुका मंडल अध्यक्ष रवी भोईर, शहर मंडल अध्यक्ष कौशिक शाह आणि युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील यांनी केले आहे.