Breaking News

पनवेलच्या महापौर, उपमहापौरपदांकरिता भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

डॉ. कविता चौतमोल, जगदिश गायकवाड यांच्या विजयाची केवळ औपचारिकता


पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाकरिता डॉ. कविता चौतमोल यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे, तर उपमहापौरपदासाठी आरपीआयचे जगदिश गायकवाड यांना संधी देण्यात आली. दोघांनी आपले अर्ज मंगळवारी (दि. 7) पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक-नगरसेविकांच्या उपस्थितीत दाखल केले.
पनवेल महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. पहिल्याच निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 78 पैकी 51 नगरसेवक जिंकून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. त्या वेळी महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेकरिता राखीव झाल्याने सुशिक्षित आणि डॉक्टर असलेल्या कविता चौतमोल यांना भाजपने संधी दिली. त्यांनी गेली अडीच वर्षे चांगले काम केले आहे.
नगरविकास खात्याने पनवेल महापौरपदाच्या या वेळी काढलेल्या सोडतीमध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले. या पदावर डॉ. कविता चौतमोल यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखविला, तसेच उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या एक वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष व नगरसेवक जगदिश गायकवाड यांना उपमहापौरपदासाठी संधी देण्यात आली आहे. या दोघांनी मंगळवारी दुपारी पालिका मुख्यालयात जाऊन सचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले.
या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, पंचायत समिती सदस्य व महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महापौर, उपमहापौरपदासाठी 10 जानेवारी रोजी निवडणूक होणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत. या महापालिकेत 78 पैकी 51 नगरसेवक भाजप मित्रपक्ष युतीचे आहेत. शेकापनेही या पदांसाठी आपले उमेदवार दिले आहेत. पक्षीय बलाबल पाहता भाजप युतीचे पारडे जड आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डॉ. कविता चौतमोल महापौरपदी, तर जगदिश गायकवाड उपमहापौर म्हणून विराजमान होणार, ही औपचारिकताच बाकी आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply