पनवेल ः बातमीदार
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे जवळपास 200 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ग्रामीण भागात 94 ठिकाणच्या इमारती कन्टेन्मेंट झोन केल्या आहेत. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील 124 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
पनवेल परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात जिथे कोरोनाचा रुग्ण सापडतो तो भाग किंवा ती इमारत तातडीने सील करण्यात येते. तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. उलवे, करंजाडे, विचुंबे, पाली देवद, देवद, भिंगारवाडी, उसर्ली खुर्द, आकुर्ली, कोप्रोली, शिरढोण, केलवणे, वहाळ, उमरोली, कोन, कसळखंड, आष्टे, पळस्पे, चिखले, चिपळे, नेरे, आदई, दापिवली (वावेघर), वडघर या ठिकाणी 28 दिवसांसाठी कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनामुळे ग्रामीण भागातील नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच अजूनही काही जणांच्या अहवालाची प्रतीक्षा कायम असून काहींचे नमुने घेतले जाणार आहेत. ज्या कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली आहे त्याच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यामुळे आकडा वाढण्याची भीती कायम आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील असल्याने त्यांचे मुंबई कनेकशन उघड झाले आहे, तर काही पॉझिटिव्ह रुग्णांची कुठल्याही प्रकारची ट्रॅव्हल हिस्ट्रीदेखील नाही.
उलवे येथे 24 इमारती, करंजाडे येथे 15, विचुंबे येथे 13, पाली देवद येथे 11, देवद येथे दोन, भिंगारवाडी येथे एक, उसर्ली खुर्द येथे सहा, आकुर्ली येथे एक, कोप्रोली येथे दोन, शिरढोण येथे एक, केळवणे येथे एक, वहाळ येथे एक, उमरोली येथे दोन, कोन येथे एक, कसळखंड येथे तीन, आष्टे येथे दोन, पळस्पे येथे दोन, चिखले येथे एक, चिपळे येथे एक, नेरे येथे एक, आदई येथे एक, दापिवली (वावेघर) येथे एक, वडघर येथे एक अशा एकूण 94 ठिकाणी कन्टेन्मेंट झोन केले आहेत.
ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे येणार्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमित सानप, नायब तहसीलदार दत्ता आदमाने, राहुल सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, गटविकास अधिकारी डी. तेटगुरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुनील नखाते आदी सज्ज असल्याचे दिसून येते. सर्वांत जास्त रुग्ण उलवेत असून रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय पनवेल, एमजीएम कामोठे, इंडिया बुल्स कोन, सेवन हिल हॉस्पिटल, मुंबई, डॉ. डी. वाय. पाटील, नेरूळ, हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई, सायन हॉस्पिटल, मुंबई, गॅलेक्सी हॉस्पिटल, मुंबई, तेरणा हॉस्पिटल, नेरूळ, सीसी सेंटर, ठाणे, रिलायन्स हॉस्पिटल, कोपरखैरणे येथे उपचार
सुरू आहेत.