आरोग्य प्रहर
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्वाधिक उद्भवत असलेल्या आजारांमध्ये कावीळ हा आजारसुद्धा आहे. काविळीमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते तसेच त्वचेचा रंग पिवळा पडतो. रक्तातील हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे अशी समस्या उद्भवते. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर बिलीरुबिन नावाचा पिवळ्या रंगाचा पदार्थ बाहेर येतो. हा पदार्थ लिव्हरमधून फिल्टर होऊन बाहेर येत असतो. याचे प्रमाण वाढल्यानंतर त्वचेचा आणि डोळ्यांचा रंग अधिकाधिक पिवळा होत जातो. या आजाराला कावीळ असे म्हणतात. ही एक लिव्हरशी जोडलेली समस्या आहे. वेळीच या आजाराकडे लक्ष दिले नाही, तर गंभीर परिणाम होऊ शकतात.
लक्षणं : डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणं, सतत थकवा येणं, ताप येणं, थंडी वाजणं, पोटदुखी, पोटाच्या वरील भागात दुखणे, लघवीचा रंग जास्त पिवळा असणं, वजन वाढणं, उलट्या होणं.
उपाय : कावीळ या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी संतुलित आहार घ्या. सगळ्यात महत्वाचं पोटभर पाणी प्या. दारू किंवा नशायुक्त पदार्थाचं सेवन करू नका. नियमित व्यायाम करा.
तुळशीचे औषधी गुण कावीळ बरी करण्यासाठी चांगले असतात. त्यामुळे तुळशीची पानं चावून खावी. या उपायाने बचाव करता येऊ शकतो.
टोमॅटोचा रस काविळीवर गुणकारी असतो. रोज सकाळी उठून टोमॅटोचा रस प्या. टोमॅटोचा रस नुसता पिणं शक्य नसेल तर त्यात मीठ आणि मिरपूड घालून प्या.
काविळीमध्ये तुमच्या लिव्हरला त्रास होतो. लिव्हरचे कार्य चांगले करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. म्हणून तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा लिंबाच्या रसाचे पाण्यासोबत सेवन करा.
या पदार्थाचे सेवन टाळा : तुम्हाला कावीळ झाली असेल तर मांसाहार, तेलकट पदार्थ, तिखट पदार्थ, जास्त मीठ, सोडीयमजन्य पदार्थांचे सेवन करू नका. बाहेरचे अन्नपदार्थ, वडा, भजी अशा पदार्थांचे सेवन करु नका. जास्त प्रमाणात शारीरिक त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्या.