वीज नाही, पाणी नाही, संपर्कही नाही! रोहेवासीयांची बिकट अवस्था
रोहे : प्रतिनिधी
रोहा शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातल्यानंतर अतोनात नुकसान झाले आहे. चक्रीवादळ थांबले, परंतु त्याचे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारा, खांब पडल्याने वीजपुरवठा बंद आहे. नळपाणी पुरवठा बंद पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. फोन, मोबाईल सेवाही खंडित झाल्याने संपर्क तुटून परिस्थिती बिकट झाली आहे.
चक्रीवादळ संपल्यानंतर नागरिकांनी आपल्या घरांवरील पत्रे, कौले बसविण्याचे काम सुरू केले आहे. पत्रे व कौलांना मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा रोह्यात भासत आहे. शेतीच्या कामात व्यस्त असलेले शेतकरीही आता घराचे व गोठ्याच्या दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहेत.
रोहे तालुक्यात विद्युत खांब मोठ्या प्रमाणात पडले आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या ताराही तुटल्यात.अशा परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने त्यांची यंत्रणा तसेच खाजगी ठेकेदारांकडून युद्धपातळीवर काम चालू केले आहे.
रोहा शहरासह ग्रामीण भागात गल्लोगल्ली झाडे कोसळली आहेत. ही झाडे काहींच्या घरांवर, तर काही ठिकाणी विद्युत पोलवर कोसळली आहेत. रोहा-कोलाड मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळून विद्युत पोल पडले, तारा तुटल्या. त्यामुळे वीज मंडळाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नगर परिषदेची शेड पडल्याने शेडखाली असलेली कार चेपली गेली. सरकारी गोडाऊनचे पत्रे, तर उपजिल्हा रुग्णालय येथील शेड उडाली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय यांचेही काही ठिकाणी पत्रे व कौले उडाली आहेत. दरम्यान, दोन दिवस हवेत गारवा, पाऊस आणि त्यानंतर पडलेले ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे आरोग्य बिगडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
छोट्या व्यावसायिकांचे झाले मोठे नुकसान
निसर्ग चक्रीवादळाने रोहा तालुक्यात तीन तासांमध्ये होत्याचे नव्हते झाले. डोळ्यासमोर घरावरील पत्रे, कौले उडून गेली. ग्रामीण भागात तर अनेकांचे संसर उघड्यावर आले आहेत, तर शहरातही नुकसान झाल्याचे दिसून येते. शहरी भागात बिल्डिंगवरील शेड उडून नुकसान झाले. शिवाय काही दुकानांची पडझड झाली. टपर्या उद्ध्वस्त झाल्याने छोट्या व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे.
पेणमध्ये लाखोंची वित्त हानी
पेण : प्रतिनिधी
निसर्गापुढे मानव कसा हतबल होतो याचा प्रत्यय बुधवारी झालेल्या चक्रीवादळामुळे आला आहे.निसर्ग चक्रीवादळाने पेणला चांगलाच तडाखा दिला. प्रशासनच्या सतर्कतेमुळे जिवितहानी टळली असली तरी लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. चक्रीवादळाचा जोर बुधवारी दुपारी 2 वाजल्यानंतर हळूहळू वाढू लागला. वादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. शहरातील व ग्रामीण भागात विद्युत पोल पडले तसेच अनेक ठिकाणी विद्युत डीपीचेही नुकसान झाल्याने शहरातील व ग्रामीण भागातील वीजपुरवठा दोन दिवस खंडीत होता.
स्थानिक प्रशासनाने वादळाचा अंदाज लक्षात घेऊन संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते. धोक्याचा ठिकाणी राहता असलेल्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले असून, या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील व नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात जाऊन पाहाणी केली आणि ताबडतोब कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरुणा जाधव, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.