Breaking News

डकवर्थ लुईस नियमामुळे फलंदाजांचा उडाला पुरता गोंधळ

न्यूझीलंड-बांगलादेश सामन्यात विचित्र प्रकार

नेपियर ः वृत्तसंस्था
न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात विचित्र प्रकार बघायला मिळाला. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ फलंदाजीला उतरला त्या वेळी आपल्याला जिंकण्यासाठी किती धावा हव्यात याचीच त्यांच्या सलामीवीरांना कल्पना नव्हती. नेपियरमध्ये झालेल्या या सामन्यात बांगलादेशचे सलामीवीर विजयी आव्हानाबाबत पुरते गोंधळलेले दिसले.
बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने 17.5 षटकात 5 विकेट गमावून 173 धावा केल्या होत्या, पण त्याचवेळी पाऊस सुरू झाला, पावसामुळे न्यूझीलंडचा डाव पूर्ण झाला नाही. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर क्रिकेट सामन्यात डकवर्थ-लुईस नियम वापरला जातो आणि नंतर फलंदाजी करणार्‍या संघाला सुधारित लक्ष्य दिले जाते, पण या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजीला सुरुवात झाली तरी विजयासाठी किती धावा करायच्यात याबाबत गोंधळ होता. तीन-चार चेंडूंनतर त्यांना विजयासाठी 16 षटकांत 148 धावा करायच्या असल्याचे सांगण्यात आले, मात्र इथेच मोठा ‘ट्विस्ट’ आला.
न्यूझीलंडचा हॅमिश बॅनेट डावातील दुसरे षटक टाकत होता. त्याने तीन चेंडू टाकल्यानंतर मॅच रेफ्री जेफ क्रो यांनी खेळ पुन्हा थांबवला. त्यानंतर मात्र बांगलादेशला जिंकण्यासाठी नवे लक्ष्य देण्यात आले. 16 षटकात 170 धावांचे लक्ष्य त्यांना मिळाले. अखेरीस बांगलादेशचा संघ सात गडी गमावून 142 धावाच बनवू शकला. यासोबतच सामना आणि मालिकाही 0-2 अशी त्यांनी गमावली.
दरम्यान, डकवर्थ-लुईस नियमामुळे क्रिकेटच्या मैदानात घडलेली ही विचित्र घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. यापूर्वीही या नियमाचा अनेक संघांना फटका बसला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply