Breaking News

चक्रीवादळाचा हाहाकार; रोह्यात फळबागांचे मोठे नुकसान; हजारो हेक्टर क्षेत्र बाधित

रोहे ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाने रोहा तालुक्यात  थैमान घालून हजारो घरांचे अतोनात नुकसान केले. अनेकांच्या घरावरील पत्रे व कौले उडाली. विजेचे खांब पडले. रोहा तालुक्यात असंख्य झाडे उन्मळून पडली. बागायतदार शेतकर्‍यांचे सर्वांत जास्त नुकसान झाले असून सर्वाधिक फटका आंबा, केळी, पपईसारख्या फळझाडांना बसला आहे. रोहा तालुक्यात सुमारे 1400पेक्षा जास्त हेक्टरमधील फळबागांचे मोठे नुकसान झाले. पोटच्या मुलाप्रमाणे वाढविलेली झाडे उन्मळून पडल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू आले आहेत.

रोहा तालुक्यातील शेतकर्‍यांनी शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. काही प्रयोगशील शेतकर्‍यांनी पारंपरिक आंबा पिकाव्यतिरिक्त हापूस व अन्य कलमी आंब्यांची लागवड केली. हे आंबे आता बहरू लागले होते, मात्र ऐन आंब्याच्य हंगामात चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्याने बागायतदारांची बहुतांश झाडे उन्मळून पडली आहेत. उत्पादन तर बुडालेच, परंतु मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले.तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी आपल्या शेतात केळी व पपईची मोठी लागवड केली होती. नवनवे प्रयोग केले होते, परंतु सर्व फळबागा निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजूचे पीकही घेतले जाते. तांबडी, घोसाळे भालगाव, कोलाड, नागोठणे, सुतारवाडी भागातील अशा अनेक बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. 15 वर्षांहून अधिक काळ या बागा शेतकर्‍यांनी जतन केल्या होत्या. रोहा तालुक्यात अनेक नारळ व सुपारीची झाडेही पडली. प्रत्येकाच्या परसबागेत असलेली नारळ, आंबा व फणसाची झाडे आजही पडलेली आहेत. यासह अन्य झाडेही पडल्याने शेतकर्‍यांना हमखास मिळणारे उत्पादन भविष्यात मिळणार नाही. बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाकडून युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येत आहेत. रोहा तालुक्यात आतापर्यंत 30 टक्के म्हणजेच 700च्या आसपास शेतकर्‍यांचे पंचनामे झाले आहेत. आता नव्याने बागा उभ्या कराव्या लागणार आहेत. त्यासाठी किमान पाच ते 10 वर्षे लागतील. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने मोफत फळझाडे उपलब्ध करून द्यावीत. त्याचबरोबर उत्पादन तयार होईपर्यंत आर्थिक मदत केल्यास पुन्हा हे वैभव उभे राहील, अशी अपेक्षा येथील शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply