कर्जत ः बातमीदार
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात कर्जत शहरातील गुंडगे प्रभागात ठाकूरवाड़ी येथील एक मोठे झाड विजेच्या खांबावर पडले होते. त्यामुळे गुंडगे भागातील तो परिसर आणि विश्वनगर चार दिवस अंधारात होते. दरम्यान, महावितरणकडून सातत्यपूर्ण प्रयत्न झाल्याने त्या परिसरात चार दिवसांनी विजेचे दिवे पुन्हा उजळले आहेत. गुंडगे भागातील विश्वनगर व ठाकूरवाडी परिसरात निसर्ग चक्रिवादळाने हाहाकार माजवला होता. अनेक वृक्ष उन्मळून पडली. त्यातील एका मोठ्या झाडाने वीजपुरवठा खंडित झाला. अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली. मोबाइल नेटवर्क गायब झाले होते. वननिवासशेजारी भलेमोठे झाड विद्युत वाहिनीवर पडून विजेचा खांब वाकला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महावितरणचे कनिष्ठ अभियंता किरण साबळे यांनी तातडीने पावले उचलून गुंडगे भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. महावितरणचे लाइनमन खंडागळे यांनी कर्जत नगर परिषद कर्मचार्यांच्या मदतीने अथक प्रयत्न करून गुंड़गे परिसरातील वीज सुरू झाली. याकामी माजी नगरसेवक दीपक मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.