Breaking News

मत्स्यदुष्काळाने मच्छीमार हैराण

बोटीवर लावण्यासाठी मोठा मासाही नाही सापडला

उरण : रामप्रहर वृत्त : समुद्राच्या खवळलेल्या लाटांचा सामना करीत आपला मासेमारी व्यवसाय करणार्‍या मच्छीमारांकडून समुद्राच्या उसळत्या लाटांचा सामना करीत कुटुंबीयांसह उत्साहात होळी साजरी करण्यात येते, मात्र या वर्षी पडलेल्या

मत्स्यदुष्काळामुळे त्यांच्या होळीचा ‘बेरंग’ झाल्याचे दिसून आले. बोटीवर लावण्यासाठीही मोठा मासा मिळाला नसल्याची खंत मच्छीमारांनी व्यक्त केली.

वर्षातून एकदाच कुटुंब मच्छीमार बोटीवर येतात आणि होळीचा उत्सव साजरा करतात. या वेळी बोटीच्या समोरच्या (नालीजवळ) भागात मच्छीमार पूजा करून सर्वात मोठा मासा बांधतो, तसेच इतर बोटींशी स्पर्धा करीत कच्चीबच्ची व महिला उत्साहात होळी साजरी करतात.

या सणासाठी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या सर्व बोटी घरी परततात. या वेळी होळीसाठी बोटी सजविल्या जातात. बोटीला रंगीबेरंगी चमकती पताके, नवीन साड्या, तसेच मोठमोठ्या फुलांच्या हाराने सजविण्यात येते. बोटीवरच संपूर्ण साहित्य ठेवून महिलांच्या हस्ते पूजा केली जाते. या वेळी मासेमारी करीत असताना पकडलेल्या मोठ्या माशाची विविधत पूजा करून बोटीच्या समोरच्या भागात लावण्यात येतो. त्यानंतर रंगाची उधळण करीत कुटुंबाची होळी सुरू होते. नाचगाण्याच्या ठेक्यावर भर समुद्रात होळी साजरी करण्याचा आनंद घेतला जातो. परंपरा म्हणून समुद्रात ही होळी साजरी केली जात असल्याची माहिती श्रीकांत कोळी यांनी दिली.

मच्छीमारीसाठी एक बोट गेल्यानंतर 10 ते 11 टन मासळी मिळत होती. यामध्ये नळ, कोळंबी, छोटी मासळी, तसेच मोठी मासळी यांचा समावेश होता. ती संख्या सध्या 2 ते 3 टनावर आली आहे. त्यामुळे व्यवसायाकरिता केलेल्या कष्टाचे फळही मिळत नसल्याची खंत विनायक पाटील या मच्छीमाराने व्यक्त केली.

पाच किलोचाही मासा सापडेना

होळी साजरी करण्यासाठी आमच्या बोटीला 15 ते 30 किलोपेक्षा अधिक वजनाचे मासे लावले जात असत, मात्र या वर्षी मासळीच्या टंचाईमुळे पाच ते सहा किलोचे मासे लावण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे मच्छीमार समीर नाखवा यांनी सांगितले.

वर्षभर समुद्रामुळेच आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही परंपरेची होळी आम्ही साजरी करीत असतो. जो मासा पूजा करून बोटीसमोर लावलेला असतो तो सायंकाळी होळीनंतर कापून त्याचे वाटे करून ते नातेवाईत, शेजारी तसेच ओळखीच्या लोकांना प्रसाद म्हणून देण्याची प्रथा आहे.

-विनया नाखवा, मच्छीमार

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply